गडचिरोली | --°C | --°C |
बंडू हरणे/धानोरा, ता.२७:कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे लोक त्याला पाळतात. आपल्या धन्याची राखण करण्यात तो कुठलीही कसूर करीत नाही. याचाच प्रत्यय काल(ता.२६)धानोऱ्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील मरकेगाव येथे आला. जहाल विषारी साप गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या अंगावर धावून येत असताना कुत्र्याने त्या सापाला तोंडात पकडले. यामुळे पोलिसांचे प्राण वाचले. मात्र, कुत्र्याला आपला गमवावा लागला.
त्याचे झाले असे की, काल संध्याकाळी धानोरा पोलिस ठाण्यातील पोलिस मरकेगाव(तुकुम) परिसरात गस्तीवर गेले. त्यांनी आपल्या सोबत एक कुत्राही नेला होता. हा कुत्रा प्रशिक्षित नव्हता. तो गावात भटकणारा होता. पण, खाकी वर्दीचा लळा लागल्याने तो ठाण्यातच वास्तव्य करायचा. हळूहळू पोलिसांची शिस्त त्याने अंगिकारली आणि तो पोलिसांचा मित्र झाला. त्यामुळे पोलिस गस्तीवर गेले की हा कुत्रादेखील त्यांच्यासोबत जायचा.
कालही हा कुत्रा पोलिसांसोबत गेला. कुत्रा पुढे आणि काही पोलिस मागे असा प्रवास सुरु होता. एवढ्यात त्याला अगदी समोरच मण्यार प्रजातीचा विषारी साप दिसला. साप दिसताच तो थांबला. मात्र, साप पोलिसांना दंश करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे कुत्र्याला राहवले नाही आणि त्याने सापाला तोंडात पकडले. लागलीच सापाने त्याच्या गळ्याला विळखा घालून दंश केला. कुत्र्याने कशीबशी आपली सुटका करुन घेतली. मात्र, हळूहळू विषाचा प्रभाव त्याच्या शरिरावर जाणवू लागला. आज सकाळी पोलिसांनी वाहन बोलावून कुत्र्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात भरती केले. परंतु उपचारादरम्यान त्याने प्राण सोडला. पोलिस जवानांचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चा जीव गमविणाऱ्या या कुत्र्यासाठी पोलिस हळहळले.