शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी

Wednesday, 23rd May 2018 11:56:28 PM

गडचिरोली, ता.२४: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ पराभूत झाले. श्री.सराफ यांनी कडवी झुंज दिल्याने या निवडणुकीत भाजपची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचे स्पष्ट होत आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपतर्फे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.रामदास आंबटकर, काँग्रेसतर्फे इंद्रकुमार सराफ, अपक्ष जगदीश टावरी व सौरभ तिमांडे हे चार उमेदवार रिंगणात होते. नंतर श्री.टावरी यांनी भाजपला, तर तिमांडे यांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. २१ मे रोजी ही निवडणूक पार पडली. त्यावेळी १०५९ मतदारांपैकी १०५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज चंद्रपूर येथे झालेल्या मतमोजणीत १०१९ मते वैध ठरली. ३६ मते अवैध ठरली, तर एकाने 'नोटा' ला आपली पसंती दिली. वैध मते पाहता ५१० मतांचा कोटा ठरतो. पहिल्याच फेरीत डॉ.रामदास आंबटकर यांना ५२८, तर इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. यामुळे डॉ.आंबटकर हे अवघ्या ३७ मतांनी विजय मिळविला. गडचिरोली, चंद्रपूर व वर्धा येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला.

भाजपची मते प्रचंड प्रमाणात फुटली.....

सुरुवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होईल, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत होता. परंतु आजच्या निवडणुकीत हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. सोबतच भाजपची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याचेही स्पष्ट झाले. चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वत्र भाजपचीच सत्ता असताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या व पूर्णवेळ काम करणाऱ्या डॉ.आंबटकरांना अवघ्या ३७ मतांनी विजय संपादन करावा लागला. ही बाब आता पक्ष गांभीर्याने घेणार असून, गद्दारी करणाऱ्यांना संकटांचा सामना करावा लागेल, असे पक्षात बोलले जात आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासांपूर्वीच इंद्रकुमार सराफ यांचे नाव जाहीर केले होते. तोपर्यंत त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले होते. सराफ हे तगडे उमेदवार असल्याचे सांगण्यात आले. परंतु अर्ज सादर केल्याच्या तीन-चार दिवसांतच सराफ अनुत्साही झाले होते. त्यानंतर बातम्या प्रकाशित होताच ते पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. त्यांनी सुरुवातीपासूनच आपला उत्साह कायम ठेवला असता तर त्यांचा विजय झाला असता, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मतेही काही प्रमाणात फुटल्याची चर्चा आहे. त्याचा फटका सराफ यांना बसला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8GYWE
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना