मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

महामंडळ हुकलेल्यांना मिळणार काय विधान परिषद निवडणुकीत संधी?

Tuesday, 1st May 2018 08:23:31 AM

गडचिरोली, ता.१: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत इच्छुकांनी भाजपकडे भाऊगर्दी केली असतानाच मागील साडेतीन वर्षांत महामंडळाची संधी हुकलेल्या मंडळींना या निवडणुकीत संधी मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेसाठी निवडून द्यावयाच्या सदस्यांची निवडणूक २१ मे होणार असून, ३ मे २०१८ ही नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख आहे. मतदारांचे संख्याबळ लक्षात घेता ही निवडणूक मागील वेळीपेक्षा यावेळी भाजपसाठी प्रचंड अनुकूल आहे. त्यामुळे डझनभर इच्छुकांनी भाजपकडे संपर्क साधला आहे. त्यातुलनेत काँग्रेसमध्ये सामसूम आहे. कालपर्यंत भाजपमध्ये विद्यमान आमदार मितेश भांगडिया, सुधीर दिवे, डॉ.रामदास आंबटकर, अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिन अग्निहोत्री, संदीप जोशी, अरुण लाखानी, चंदनसिंह चंदेल, वसंत वारजूरकर इत्यादी नावांची चर्चा सुरु होती. प्रत्येकालाच तिकिट मिळण्याची आशा असून, बहुतांश मंडळींनी विविध नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या आहेत. परंतु या नावांपैकी बरीच नावे मागे पडली आहेत. अशातच चंदनसिंह चंदेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त फोटोसह एका वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा नव्या चर्चेला उधाण आले आहे. श्री.चंदेल हे वनविकास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांना तिकिट दिल्यास आधीच महामंडळाची संधी हुकलेल्यांचे काय, असा सवाल पक्षातून उपस्थित होऊ लागला आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अशी संधी हुकलेल्यांची यादी मोठी आहे. त्यात चिमूरचे वसंत वारजूरकर, गडचिरोलीचे, बाबूराव कोहळे, किशन नागदेवे यांचाही समावेश आहे. या तिघांनाही महामंडळाचे आमिष दाखविण्यात आले होते. परंतु साडेतीन वर्षे लोटूनही त्यांना काहीही मिळालेले नाही.

नागभिड तालुक्यातील रहिवासी असलेले वसंत वारजूरकर यांनी २००४ च्या निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. अवघ्या दीड वर्षाच्या जनसंपर्कातून त्यांनी त्यावेळी २४ हजार मते मिळविली होती. पुढे नागभिड तालुक्याचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आल्यानंतर श्री.वारजूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन २००९ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविली. त्यावेळी कुठेच सत्ता नसताना व मुबलक साधनसामग्रीची कमतरता असताना त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तब्बल ६० हजार मते घेतली होती. परंतु पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कीर्तीकुमार भांगडिया यांना तिकिट दिले. त्यावेळी वसंत वारजूरकर यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु पुढच्या निवडणुकीला दीड वर्षे शिल्लक असताना वारजूरकरांची उपेक्षाच करण्यात आली. अशावेळी विधान परिषद निवडणुकीत संधी देऊन पक्षाने वारजूरकरांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा वारजूरकर समर्थकांना आहे. तसेही नागभिड तालुका ब्रम्हपुरी मतदारसंघात असताना व आता चिमूरमध्ये गेल्यानंतरही या तालुक्यातील कार्यकर्त्यांना सतत विविध पक्षांनी डावलण्याचेच काम केले आहे. त्याअनुषंगाने वारजूरकरांचे नाव पुढे केले जात आहे. वसंत वारजूरकर हे विद्यमान विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या निवडणुकीत मितेश भांगडिया यांचे सुपुत्र कीर्तीकुमार भांगडिया यांच्यासाठी वारजूरकरांनी आपल्या उमेदवारीवर पाणी फेरले होते. त्याची भरपाई वारजूरकरांना विधान परिषदेचे तिकिट देऊन करावी, असा एक मतप्रवाह कार्यकर्त्यांमध्ये आहे.

अशीच स्थिती गडचिरोली जिल्ह्यातील मंडळींचीही आहे. देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनाही महामंडळाचे आश्वासन देण्यात आले होते. देसाईगंज नगर परिषदेत दोनदा व यंदा जिल्हा परिषदेत सत्ता प्रस्थापित करण्यात नागदेवे यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील नगर पंचायतींमध्येही नागदेवेंच्या नेतृत्वात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्यांनाही काही मिळालेले नाही. ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे यांच्याही वाट्याला उपेक्षाच आली आहे. या सर्व बाबींचा भाजपश्रेष्ठी विचार करतात काय, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RBQJ4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना