गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मतदानाचा दिवस सणासारखा साजरा करा : रणजीत कुमार

Monday, 13th October 2014 11:21:53 PM

विधानसभा निवडणूक 2014 : विशेष मुलाखत


मतदानाचा दिवस सणासारखा साजरा करा : रणजीत कुमार
नक्षलप्रभावित असलेला गडचिरोली जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. निवडणुकीत अधिकाधिकपणे मतदार राजाने मतदानाचा हक्क बजावावा. पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान या त्रिसूत्रीनुसार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावून हा दिवस सणासारखा साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. एकूणच या निवडणुकीच्या तयारीबाबत  जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांच्याशी साधलेला हा संवाद.
१)    विधानसभा निवडणुकीला आपण कशाप्रकारे सामोरे जात आहात ?
        स्वीप म्हणजेच (Systematic voters Education Electoral Participation) मतदारांना मतदान प्रक्रियेबाबत शिक्षित करून सहभाग वाढविण्यासाठी शासनाचे सर्व विभाग, व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था आदींना सोबत घेऊन मतदारांत मतदान करण्याबाबत जागृती निर्माण करण्यात येत आहे. भावी मतदारांनाही मतदानाच्या हक्काबाबत जागृत करण्यात येत आहे. जनजागृतीवर अधिक भर देऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 69.84 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  आता विधानसभा निवडणुकीत त्यापेक्षाही अधिक प्रमाणात मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  


२)    शासनाच्या कोणकोणत्या विभागांमार्फत जागृती करण्यात येत आहे ?
 आरोग्य, शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तंत्र शिक्षण, पुरवठा, जिल्हा माहिती कार्यालय,  गोंडवाना विद्यापीठ,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महिला आणि बालविकास, कृषी, नगर परिषद, नेहरू युवा केंद्र आदी शासनाच्या महत्त्वपूर्ण विभागामार्फत स्वीप टप्पा दोनच्या माध्यमातून मतदानाबाबत जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येतो आहे.  त्यामुळे निश्चितच मतदारांत मतदानाबाबत जागृती होऊन मतदानातही वाढ होण्यास मदतच होणार आहे, याचा विश्वास वाटतो.


३)    मतदारांत जागृती करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत ?
 आरमोरी, अहेरी आणि गडचिरोली विधानसभाक्षेत्रामध्ये 'इलेक्शन एक्सप्रेस' रथाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. फ्लेक्स, माहिती पुस्तिका, हस्तपुस्तिका, इव्हीएम मॉक पोलिंग, पथनाट्य,  लोककला, युवा संसद, कॅम्पस ॲम्बेसेडर, शाळकरी मुलांचे संकल्प पत्र, विद्यार्थ्यांची रॅली,  मतदार चिठ्ठी वितरण, विविध स्पर्धा, प्रसारमाध्यमे आदी माध्यमातून मतदारांत आणि भावी मतदारांत मतदान करण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. मतदार जागृतीसाठी दुर्गोत्सवात देखाव्यांसाठीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मतदारांकरीता टोल फ्री क्रमांक 07132-155212 हा क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांकरीता उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयात मतदार यादीही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.  

पेड न्यूजवर पायबंद घालण्यासाठी काय केले आहे  ?  
जिल्हा प्रसारमाध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा मी अध्यक्ष आहे. उपविभागीय अधिकारी सदस्य आणि जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव आहेत. या समितीमार्फत पेड न्यूज संबंधातील तक्रारी, बाबी यांची तपासणी करण्यात येते आहे. माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.  जिल्हा माहिती कार्यालयामध्ये निवडणुकीशी संबंधित प्रसार माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी इलेक्ट्रॉनिक माध्यम, मुद्रित माध्यम यावर संनियंत्रण करण्यात येते आहे.
 
४)    सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपण काय प्रयत्न केले आहेत ?
 सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रशासनातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. जनतेने पारदर्शक, निर्भय आणि नि:पक्षपणे आणि नैतिक मतदान करावे. सर्वांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी मतदार संघातील एकूण 893 मतदान केंद्रावरील मतदान अधिकारी, कर्मचारी, पोलिस आदींसह जिल्ह्यातील 3,76, 050 पुरूष आणि 3, 55055 महिला मतदारांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्ह्यात 893 मतदान केंद्रांपैकी 209 अतिसंवदेनशील आणि 245 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. याठिकाणीही विशेष काळजी घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.  मतदान केंद्रांवरही मतदारांकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

५)    मतदारांसाठी आपला काय संदेश आहे ?
लोकशाही बळकटीकरणसाठी आणि नागरिकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अठरा वर्षावरील सर्व मतदारांनी  दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावावाच. या दिवशी सर्व कामगारांना पगारी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. तरी सर्व कामगार, आस्थापना यांनी याची नोंद घ्यावी. अठरा वर्षावरील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस केवळ मतदानाचा दिवस न समजता या दिवशी आपला लोकशाहीचा सण आहे.  या विचाराने प्रत्येकाने आनंदात आणि उत्साहात हा सण साजरा करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.

श्याम टरके,  
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EENE0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना