गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

खून करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

Monday, 23rd April 2018 08:02:09 AM

गडचिरोली, ता.२३: जळाऊ लाकडे चोरुन नेल्याच्या संशयावरुन इसमाची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हिवराज केवटराम उईके रा.उरुमवाडा, ता.एटापल्ली असे दोषी इसमाचे नाव आहे.

७ एप्रिल २०१५ ची गोष्ट. हिवराज उईके हा सकाळी ७ वाजताच्या सुमारास काही वर्षांपूर्वी तोडून ठेवलेली बेहडा व मोहाच्या झाडाची लाकडे गोळा करावयास गेला. परंतु शेतात लाकडे नव्हती. एवढ्यात बाजूच्या शेतात मादगी लटी नरोटे(६०), त्यांची सून पूनम उर्फ पुनीबाई नरोटे(२२) व वनिता मादगी नरोटे(२१) हे मोहफुले वेचताना दिसले. त्यानंतर हिवराज उईके याने पुनीबाई नरोटे हिला माझ्या शेतातील लाकडे तुम्ही नेली का, अशी विचारणा केली. त्यावर आम्हाला माहिती नसल्याचे पुनीबाईने सांगितले. मात्र, मादगी नरोटे याने 'तू आम्हाला लाकडे नेल्याचे कसे काय विचारत आहे?' असा प्रश्न हिवराज उईके यास केला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हिवराज आपल्या शेतातून मादगीच्या शेतात गेला व त्याने कुऱ्हाडीने मादगीच्या डोक्यावर प्रहार केला. यात तो घटनास्थळीच मरण पावला. त्यानंतर आरोपी हिवराज उईके हा कुऱ्हाड घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. जारावंडी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक वाय.व्ही.पारधी यांनी आरोपी हिवराज उईके याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

आज या प्रकरणाचा निकाल लागला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी हिवराज उईके यास भादंवि कलम ३०२ अन्वये आजन्म कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VWIW1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना