शनिवार, 23 फेब्रुवारी 2019
लक्षवेधी :
  आरमोरी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे हैदरभाई पंजवानी यांची बहुमताने निवड             दुसऱ्या दिवशीही पेंढरी येथे तालुका निर्मितीसाठी हजारो नागरिकांचे आंदोलन सुरुच             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
95%
नाही :
5%

लोकसभा निवडणूक: गडचिरोली-चिमूर क्षेत्रासाठी संभाव्य नावांची चर्चा सुरु

Saturday, 7th April 2018 07:31:35 AM

गडचिरोली, ता.७: देशभरातील राजकीय वातावरणात वाढलेल्या उष्णतेच्या झळा गडचिरोलीपर्यंत पोहचल्या असून, वातावरण थंड करण्यासाठी लोकसभा निवडणूक यंदाच्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता लक्षात घेता गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरु केल्याचे दिसत आहे.

नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयानंतर देशभरातील व्यापारी व व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात असंतोष उफाळून आला. हा असंतोष अजूनही खदखदतच आहे. त्यातच भिमा कोरेगाव व अॅट्रॉसिटी अॅक्टसारख्या अचानक निर्माण झालेल्या प्रश्नांनीही देशभरातील वातावरण ढवळून निघाले. या प्रश्नांमधून राजकीय धृवीकरण करण्यात सरकार बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे लोकसभेच्या व जमल्यास विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर २०१८ मध्ये घेण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने डिसेंबरमध्येच निवडणुका होतील, असे गृहीत धरुन राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पातळीवर मोठे संघटनात्मक बदल केले आहेत, तर भाजपने बूथरचनेचे ९५ टक्के काम पूर्ण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही पश्चिम महाराष्ट्रात हल्ला बोल मोर्चे काढून वातावरण निर्मिती करीत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेऊन चांगली मोट बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. या सर्व घडामोडी लोकसभा निवडणूक जवळ आल्याचे संकेत देत आहेत.

देश व राज्य पातळीवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातही उमेदवार चाचपणीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे विद्ममान खासदार अशोक नेते हे पक्षाकडे आपली दावेदारी पुन्हा करतील. भाजपने खासदार अशोक नेते यांना अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले आहे. खा.नेते यांनी वजनदार नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. जनमानसातही त्यांची लोकप्रियता कायम आहे. त्यामुळे खासदार नेते यांचे तिकिट कापणे एवढे सोपे नाही. परंतु अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व विद्ममान राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा सूर पक्षातील काही मंडळींकडून काढला जात आहे. ३१ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गडचिरोलीत आले होते. त्यांनी अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही केले. २०१४ ची विधानसभा निवडणूक होऊन साडेतीन वर्षे झाल्यानंतर आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला दीड वर्षे शिल्लक असताना अम्ब्रिशराव आत्राम यांनी अचानक मध्यवर्ती गडचिरोलीत जनसंपर्क कार्यालय सुरु करणे, ही लोकसभा निवडणुकीची तयारीच असल्याचे बोलले जात आहे. मात्र 'नेते की आत्राम?' या प्रश्नावर भाजप कार्यकर्ते पक्षाकडे बोट दाखवीत आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ.विनायक इरपाते हेही मध्यंतरी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावून गेले. आरमोरीत डॉ.इरपाते यांचे होर्डिंग्ज शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख हरीश मने यांच्या सोबत दिसले. त्यांचे होर्डिंग्जही बरेच काही सांगून जातात. याशिवाय येत्या एक-दोन महिन्यांनी होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषद सदस्याची निवडणूकही भाजपसाठी महत्त्वाची आहे. जेव्हा महामंडळांवरील नियुक्त्यांचा प्रश्न आला; तेव्हा भाजपने जिल्ह्यातील एक-दोन ज्येष्ठ नेत्यांना विधान परिषदेचे गाजर दाखवून थांबवून ठेवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी विधान परिषद निवडणूकही भाजपसाठी महत्वाची आहे. 

इकडे काँग्रेसनेही संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केल्याची माहिती आहे. माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी हे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नाहीत. शिवाय माजी खासदार मारोतराव कोवासे यांनाही लोकसभा निवडणुकीत स्वारस्य नाही. डॉ.उसेंडी यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे, तर मारोतराव कोवासे यांना त्यांच्या मुलाला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे आहे. त्यामुळे कॉग्रेसमध्ये कधी नव्हे एवढी उमेदवाराची टंचाई जाणवत आहे. या टंचाईच्या काळात गोंदियाचे डॉ.नामदेव किरसान यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहे. डॉ.किरसान यांनी २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण लोकसभा क्षेत्रात राहुल गांधींचा फोटो असलेले 'मिशन २०१४' असे होडिंग्ज लावले होते. परंतु तेव्हा त्यांचा पत्ता कट झाला होता. आता पुन्हा ते सक्रिय झाल्याची चर्चा आहे. डॉ.किरसान हे आदिवासी हलबी समाजाचे आहेत. एकट्या आरमोरी विधानसभा क्षेत्रात हलबी समाजाचे सुमारे १९ हजार मतदार आहेत. त्यामुळे डॉ.किरसान यांचे नाव चर्चेत आहे. डॉ.किरसान यांच्याबरोबरच जिल्ह्यात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त अधिकारी व सुप्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर यांचे नावही अचानक चर्चेत येऊ लागले आहे. प्रभू राजगडकर हे माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांचे भाऊ असून, अनेक आंदोलनात ते सक्रिय असतात. आदिवासींबरोबरच दलित समाजाशी श्री.राजगडकर यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. 

भिमा कोरेगाव व अॅट्रासिटी अॅक्टच्या मुद्द्यांवर एकवटलेल्या दलित समाजाची मते कॅश करण्याच्या अनुषंगाने प्रभू राजगडकर यांचे नाव काँग्रेसमध्ये वेगाने रेटले जाण्याची शक्यता आहे. कारण भाजप सत्तेत आल्यानंतरच्या काळात विविध मुद्द्यांवरुन दलितांमध्ये असंतोष खदखदत आहे. हा असंतुष्ट दलित मतदार काँग्रेसकडे वळण्याची भीती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु भिमा कोरेगावच्या घटनेनंतर हा मतदार प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने वळल्याचे चित्र दिसत आहे आणि सत्ताधाऱ्यांनीही भिमा कोरेगावचा मुद्दा तेवत ठेवून दलित मतदार काँग्रेसकडे न जाता तो प्रकाश आंबेडकरांकडे जाऊन काँग्रेसचा जनाधार कमकुवत करण्याची यशस्वी खेळी खेळली आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दलितांना आपल्याकडे वळविण्याची ताकद असणाराच उमेदवार निवडावा लागणार आहे. राजगडकरांचे नाव त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे, असे जाणकारांना वाटत आहे.

भाजप व काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सध्या प्रचंड उदासिन असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सारी भिस्त माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरच अवलंबून आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तरच धर्मरावबाबा हे लोकसभेची निवडणूक लढवतील;अन्यथा नाही, असे कार्यकर्ते सांगत आहेत. कारण धर्मरावबाबांविषयी लोकांचे मत चांगले असले; तरी अहेरी विधानसभा वगळता उर्वरित मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड कमकुवत झालेली आहे. अशा स्थितीत एकट्याने लोकसभा निवडणूक लढण्याची चूक राष्ट्रवादी काँग्रेस करणार नाही. शिवाय धर्मरावबाबा आत्राम यांचे नाव वगळता राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे नवे ताकदीचे उमेदवार निर्माण केले नाही. दिवंगत आर.आर.पाटील पालकमंत्री असतानाही राष्ट्रवादीला नवे ताकदीचे उमेदवार निर्माण करता आले नाही.

शिवसेनादेखील सध्या प्रचंड सुस्त असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने या पक्षाने अजूनही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे भाजप व शिवसेना यांची युती झाली नाही, तर स्वतंत्रपणे निवडणूक लढताना शिवसेनेला दहा वेळा विचार करावा लागणार आहे. एकंदरित, आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांभोवतीच फिरत राहतील, असे सध्यातरी दिसते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
55I0F
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना