गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

...अखेर स्वत:ची किडनी दान करुन 'तिने' दिले पतीला जीवदान

Thursday, 5th April 2018 02:57:17 AM

बंडुभाऊ लांजेवार/कुरखेडा, ता.५:सती युगात राजा सत्यवानाचे प्राण पत्नी सती सावित्रीने आपल्या तपश्चर्येने यमराजाकडून परत मिळविल्याची कथा सर्वश्रूत आहे. मात्र, कुरखेडा येथील एका पत्नीने मृत्युच्या दाढेत सापडलेल्या आपल्या पतीला स्वत:ची किडनी दान करुन जीवदान दिल्याची घटना घडली. या आधुनिक सती सावित्रीचे नाव आहे माई उर्फ उर्मिला मेश्राम.

प्रा. अशोक मेश्राम हे स्थानिक शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत. मनमिळाऊ स्वभावाचे व सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या प्रा.मेश्राम यांना पत्नी माई उर्फ उर्मिला आणि अक्षय व राधा ही दोन मुले आहेत. दोन वर्षांपूर्वी प्रा.मेश्राम यांना रक्तदाब व मधुमेहाच्या आजाराने ग्रासले. सुरुवातीला आजाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हळूहळू आजाराची तीव्रता वाढू लागली. नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरुवातीला डायलिसीस करण्याचा सल्ला दिला. पाहता पाहता दोन्ही किडन्या ६५ टक्के निकामी झाल्याचे निदान झाले. पुढे डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. अखेर नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला खरा; पण किडनी देणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला. नातेवाईकांकडे विचारपूस सुरु झाली. आई, भाऊ, बहिणीकडून असमर्थता दर्शविण्यात आली. अशावेळी पतीचे प्राण वाचविणे गरजेचे असल्याने पत्नी माई उर्फ उर्मिला यांनीच स्वत:ची किडनी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याही निर्णयाला सुरुवातीला विरोध दर्शविण्यात आला. परंतु निर्णयापासून त्या डगमगल्या नाही. डॉ.विशाल रामटेके यांनी त्यांच्या निर्णयाला साथ दिली. विविध तपासण्या व अन्य सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉ.संजय कोलते व त्यांच्या सहकाऱ्यांनी किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर ते नुकतेच कुरखेडा येथे सुखरुप परतले आहेत. आता पती व पत्नीचे आरोग्य उत्तम आहे. स्वत:ची किडनी दान करुन मृत्युच्या दाढेतून आपल्या पतीराजाला बाहेर काढणाऱ्या पत्नीने समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. या धाडसी निर्णयाबद्दल एका बचत गटाने नुकताच उर्मिला मेश्राम यांचा सत्कार केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X40L8
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना