बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सिरोंचात थरार! आधी पत्नीची आत्महत्या, नंतर पतीचा खून

Tuesday, 13th March 2018 07:25:19 AM

सिरोंचा, ता.१३: येथील नागरिकांनी आज थरार अनुभवला. घरगुती वादातून पत्नीने आत्महत्या केल्यानंतर बहिणीच्या मृत्युस तिचा पती जबाबदार असल्याच्या रागाने साळ्यांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना ग्रामीण रुग्णालय परिसरात आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

राजन्ना नामाला(३५) रा. चिंतरवेल असे मृत इसमाचे नाव असून, संतोष सोदारी(३०) व रमेश लखमय्या सोदारी(२८) अशी आरोपींची नावे आहेत. आठ वर्षांपूर्वी राजन्ना नामाला याचे संध्याराणी सोदारी हिच्याशी लग्न झाले होते. परंतु दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संध्याराणीने कीटकनाशक प्राशन केले. संध्याकाळी तिला अंकिसा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तिला रात्री सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. 

रात्र झाल्याने संध्याराणीचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशीच होणार होते. त्यामुळे राजन्ना व सोबतच्या मंडळींनी रुग्णालयातच अख्खी रात्र जागून काढली. आज सकाळी संध्याराणीचे दोन भाऊ व माहेरची मंडळी रुग्णालयात पोहचले. परंतु आमच्या बहिणीच्या मृत्युस राजन्ना हाच जबाबदार असल्याचे सांगून संध्याराणीचे संतोष सोदारी व रमेश सोदारी हे दोन भाऊ व अन्य नातेवाईकांनी प्रवेशद्वारावरच राजन्नाशी हुज्जत घालून त्यास मारहाण केली. राजन्नाच्या नातेवाईकांनी भांडण करणाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अपयशी ठरले. त्यानंतर संतोष सोदारी व रमेश सोदारी यांनी राजन्नावर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक श्री.सुपे घटनेचा तपास करीत आहेत. 

राजन्ना व संध्याराणी यांना एक ५ वर्षीय व दुसरा २ वर्षीय मुलगा आहे. परंतु आईपाठोपाठ वडिलाचाही खून झाल्याने दोन्ही चिमुकली बालके पोरकी झाली आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
CXN9Z
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना