मंगळवार, 21 ऑगस्ट 2018
लक्षवेधी :
  दुसऱ्या दिवशीही पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी, भामरागड तालुक्यातील गावांचा संपर्क तुटलेलाच             पुरात कारसह अडकलेल्या दोघांची सहिसलामत सुटका-गडचिरोली तालुक्यातील गुरवळा येथील घटना             गोसेखुर्द धरणाचे १० दरवाजे दीड मीटरने, तर २३ दरवाजे १ मीटरने उघडले, ७९५४ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग             हैदराबाद-गडचिरोली बस नाल्यात कोसळली,आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील नंदीगावनजीकची घटना, प्रवासी सुरक्षित             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करा-प्रभू राजगडकर

Friday, 9th March 2018 06:35:54 AM

गडचिरोली, ता.९: गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती, मानवी व्यवहार व आधुनिकता तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना आणि त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास व्हावा आणि त्याविषयीची संधी महाराष्ट्रासह जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध व्हावी, यासाठी गोंडवाना विद्यापीठात 'आदिवासी अध्यासन' सुरु करावे, अशी मागणी सुप्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर यांनी केली आहे.

कवी प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठविले आहे. पत्रात श्री.राजगडकर यांनी म्हटले आहे की, गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन आठ वर्षे लोटली आहेत. सद्य:स्थितीत या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये असून, त्यात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. हे दोन्ही जिल्हे आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार बऱ्यापैकी होत आहे. सद्य:स्थितीत गोंडवाना विद्यापीठात मराठी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र अशा नेहमीच्याच शाखा आहेत. परंतु ज्या आदिवासीबहुल भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या आदिवासी बोलीभाषा बोलल्या जातात, त्यासंदर्भात या विद्यापीठात भाषाशास्त्राच्या अनुषंगाने कोणताही अभ्यासक्रम नाही, हे दुर्दैव आहे, असे श्री.राजगडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

देशात आदिवासी बोलीभाषा व अन्य लोकभाषांविषयी भाषातज्ज्ञ चिंता व्यक्त करीत आहेत. या बोलीभाषा टिकविल्या पाहिजेत याबाबत ते संशोधन करुन आपली अभ्यासपूर्ण मते व्यक्त करीत आहेत. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी यांनी तर 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण' हा ग्रंथ अन्य भाषातज्ज्ञ व अभ्यासकांच्या सहकार्याने साकार केला. शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने गोंडी-मराठी शब्दकोष १९९९ मध्ये प्रकाशित केला. या संस्थेचे तत्कालिन आयुक्त दिवंगत डॉ.गोविंद गारे यांनी 'प्रिमिटीव्ह ट्राईब:माडिया' यावर अत्यंत मौलिक संशोधन केले. परंतु दुर्दैवाने ते ग्रंथ स्वरुपात येऊ शकले नाही. आदिवासींची भाषा, त्यांचा विकास यासंदर्भात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. डॉ.देवगांवकर दाम्पत्याने आदिवासींच्या भाषा व संस्कृतीचा विकास यावर अभ्यास करुन अनेक ग्रंथ साकार केले. त्यातील 'माडिया गोंडीची बोली' हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. दिवंगत भुजंग मेश्राम यांनीही आदिवासी भाषा व साहित्याबाबत अत्यंत मोलाचे लिखाण केले आहे. डॉ.भाऊ मांडवकर यांचा 'कोलाम' हा ग्रंथही सर्वश्रुत आहे. माजी आमदार दिवंगत नेताजी राजगडकर यांनीही बरेच लेखन केले आहे. तसेच नव्या पिढीतील अनेक आदिवासी व आदिवासीतर अभ्यासक आदिवासींच्या भाषा, संस्कृती, विकास व त्यांचे आजचे समकालिन प्रश्न यावर लेखन आणि संशोधन करीत आहेत, याकडेही प्रभू राजगडकर यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

आज महाराष्ट्रातील बहुतेक विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांमध्ये 'आदिवासी साहित्य' हा विषय समाविष्ट असून, अनेक संशोधक प्राध्यापक आदिवासी साहित्य व तत्संबंधी अन्य विषयांवर पीएचडी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्राची स्थापना करावी, अशी आग्रही मागणी प्रभू राजगडकर यांनी केली आहे. आदिवासी अध्यासन सुरु केल्यास गोंडवाना विद्यापीठ असलेल्या भागात बोलल्या जाणाऱ्या आदिवासींच्या बोलीभाषा, आदिवासी संस्कृती व मानवी व्यवहार आणि आधुनिकता तसेच आदिवासींच्या विकासाच्या संकल्पना व त्यांच्यात अवगत असलेल्या विविध कला यांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची संधी महाराष्ट्रासह जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध होईल, असेही श्री.राजगडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5U0GH
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना