शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शिक्षिकेच्या समयसूचकतेमुळे फसला बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न

Thursday, 15th February 2018 07:26:25 AM

देसाईगंज, ता.१५: शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्डातील पाच विद्यार्थांच्या अपहरण प्रकरणाची शाई वाळत नाही; तोच शहरातील ब्रम्हपुरी मार्गावरील दि लिटल फ्लॉवर स्कूलमध्रील तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना आज देसाईगंज येथे घडली. मात्र, शिक्षिकेच्या समयसूचकतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. एकाच आठवड्यातील या दुसऱ्या घटनेमुळे देसाईगंज शहर चांगलेच हादरले असुन, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

त्याचे झाले असे की, देसाईगंज शहरातील उद्योजक आकाश अग्रवाल यांनी आज त्यांच्या एकुलत्या एक तीन वर्षीय मुलीला ब्रम्हपुरी मार्गावरील पी. बी. लॉनजवळील चेक नाक्याजवळच्या दि लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये सोडुन दिले. अग्रवाल यांच्या मुलीला जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार 'परी' या नावानेच ओळखतात. 'नायरा' हे तिचे शाळेतील नाव असुन, तिला आणण्यासाठी तिची आजी दररोज शाळेत जात असे. मात्र, आज सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास रस्त्यालगतच असलेल्या दि लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये दुपट्टा बांधलेले दोघे जण मोटारसायकलवर आले. त्यांनी नायरा अग्रवालला घेण्यासाठी आलो आहोत, अशी बतावणी केली. मात्र दि लिटल फ्लॉवर स्कूलच्या शिक्षिका अनिसा लालानी यांनी नायराचे वडील आकाश अग्रवाल यांना विचारुन सांगतो, असे म्हणून आत जाऊन मोबाईलवरुन आकाश अग्रवाल यांना नायराला घेण्यासाठी कुणाला पाठविले काय, अशी विचारणा केली. त्यावेळी नायराला घेण्यासाठी रोज तिची आजी येते. आम्ही कुणालाही पाठवले नाही, असे उत्तर अग्रवाल यांनी दिले. हे सांगण्यासाठी शिक्षिका अनिसा लालानी बाहेर येण्यापूर्वीच मोटारसायकलवरील दोघांनीही तेथून पोबारा केला. .त्यामुळे मोटारसायकलवरील दुपट्टा बांधलेले दोघे जण नायराचे अपहरण करण्यासाठीच आले होते, हे स्पष्ट होत आहे. 

नायरा अग्रवाल हे नाव फक्त घरातील मंडळी व दि लिटल फ्लॉवर स्कूलच्या शिक्षिकांनाच माहित आहे. आज शाळेत आलेल्या अपहरणकर्त्यांनी थेट नायरा आकाश अग्रवाल हिला घेण्यासाठी पाठविण्यात आलो आहोत, असे सांगितल्याने यात कुणी तरी जवळचेच लोक असावेत, अथवा संपूर्ण माहिती काढलेल्या व्यक्तीचे हे कटकारस्थान असू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

६ फेब्रुवारीला डॉ.आंबेडकर वॉर्डातील नगर परिषद शाळेतत सहा बुरखाधारी लोकांनी पाच विद्यार्थांचे अपहरण करुन अनिकेत शाळेमागील भाटिया पटेल यांच्या शेतातील ओसाड घरात तब्बल पाच तास कोंडुन ठेवले होते. मात्र, अपहरणकर्त्यांची गाडी वेळेवर न आल्याने त्यांचा डाव फसला होता.

 या प्रकरणाला एक आठवडादेखील उलटला नाही; तोच आज दुसरी घटना घडल्यामुळे देसाईगंज शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. सलग दुसऱ्या घटनेमुळे देसाईगंज शहर अक्षरश: हादरले असुन पोलिसांनी मात्र पहिल्या प्रकरणाकडे साधारण घटना म्हणून बघितल्याने अपहरण करणाऱ्यांचे मनोबल उंचावल्याचे दिसून येत आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JU11O
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना