शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शिवशंभोच्या दर्शनासाठी मार्कड्यात उसळला जनसागर

Tuesday, 13th February 2018 01:06:31 AM

गडचिरोली, ता.१३: "हर बोला... हर हर महादेव" असा गजर करीत आज लाखो भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मार्कडादेव येथे भरलेल्या यात्रेत हजेरी लावून शिवशंभो व महामृत्युंजय मार्कंडेश्वराची मनोभावे पूजा-अर्चा केली. चपराळा, अरततोंडी, वैरागड येथेही हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.

मार्कंडादेव येथे आज पहाटे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी व जिल्हा परिषद अध्यक्ष्र योगीता भांडेकर यांनी शिवलिंग व मार्कंडेश्वराची महापूजा केली. यावेळी डॉ.भारत खटी, पूजारी पंकज पांडे, शुभांगी पांडे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पहाटे ४ वाजता महापूजेस सुरुवात झाली. सकाळी ६ वाजता महापूजा आटोपल्यानंतर रांगेतील भाविकांना पूजेसाठी सोडण्यात आले. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिया या जिल्हयांतील नागरिकांसह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील भाविकांनीही मार्कंडादेव यात्रेत सहभागी होऊन शिवशंभोचे दर्शन घेतले. मार्कडेश्वर देवस्थानतर्फे भाविकांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला. हजारो भक्तांनी मार्कडेश्वर मंदिरालगतच्या वैनगंगा नदीत स्नान केले. या यात्रेच्या आयोजनसाठी मार्कडेश्वर ट्रस्ट, महसुल विभाग, पंचायत विभागाने सहकार्य केले. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. आणखी पाच दिवस ही यात्रा सुरु राहणार आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी नागपूर, गडचिरोली, अहेरी, मूल व चंद्रपूर येथील आगारांनी अतिरिक्त बस गाड्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरुंची गैरसोय टळली आहे. यात्रेत विविध शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करणारे स्टॉल लावले असून, काहींनी भोजन व पाणपोईची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

मार्कडादेव येथील यात्रेशिवाय चपराळा येथेही भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथेही यात्रा भरली आहे. तेथील महादेव गडावरील पुरातन हेमाडपंथी शिवमंदिरात आ.क्रिष्णा गजबे व विद्याताई गजबे यांनी महादेवाची पूजा केली. यावेळी कुरखेडा येथील अॅड.प्रमोद बुद्धे, विवेक बुद्धे, चंद्रशेखर भडांगे तसेच श्री भगवान महादेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रामुख्याने उपस्थित होते. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथेही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली.

अवकाळी पावसामुळे गैरसोय

मार्कंडादेव येथील यात्रेत दुरदुरुन आलेले नागरिक विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावत असतात. यंदाही शेकडो दुकाने यात्रेत लागली आहेत. परंतु काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याने दुकानदारांची गैरसोय झाली. काही जणांचे नुकसानही झाले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HD8ME
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना