शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे व किशोर गजभिये यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Friday, 9th February 2018 04:46:27 AM

गडचिरोली, ता.९: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे तसेच मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोघांचेही स्वागत केले. 

उत्तम खोब्रागडे यांनी आयएसएस झाल्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, बेस्टचे महाव्यवस्थापक, आदिवासी खात्याचे प्रधान सचिव अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर उत्तम खोब्रागडे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये विद्ममान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला होता. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

दुसरे स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. त्यानंतर त्यांनी मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपमध्ये प्रवेश केला. अनेक सामाजिक संघटनांशी ते संबंधित होते. जून २०१४ मध्ये त्यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर उत्तर नागपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ.नितीन राऊत यांना तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले होते. त्यावेळी भाजपचे डॉ. मिलिंद माने अवघ्या १३ हजार ७१८ मतांनी विजयी झाले होते. दुसऱ्याच वर्षी २०१५ मध्ये बसपाचे एक दिग्गज नेते प्रा.डॉ.सुरेश माने यांना बसपाने पक्षातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत किशोर गजभिये हेदेखील बीआरएसपीत गेले होते.  जवळपास अडीच वर्षे बीआरएसपीत काम केल्यानंतर गजभिये हे बीआरएसपीपासून दुरावलेले होते. अखेर त्‍यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तमराव खोब्रागडे व किशोर गजभिये यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला, तरी भाजपचे ज्येष्ठ नेत नितीन गडकरी यांच्याशी या दोघांचेही सुरुवातीपासूनच मधूर संबंध असल्याचे सांगण्यात येते. 

गोंडपिपरी तालुक्यातील आहेत उत्तम खोब्रागडे

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोवर्धन हे गाव उत्तमराव खोब्रागडे यांचे मूळ गाव आहे. या गावात खोब्रागडे कुटुंबाची ६ घरे आहेत आणि त्यातील ४ जण आएएएस झाले आहेत. निवृत्त सनदी अधिकारी वसंतराव खोब्रागडे यांचे मूळ गावदेखील गोवर्धन हेच आहे. सध्या केरळमधील तिरुअनंतपुरम येथे जिल्हाधिकारी असलेले राजन खोब्रागडे हेसुद्धा गोवर्धन याच गावचे आहेत. उत्तमराव खोब्रागडे यांची मुलगी देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकत उपमहावाणिज्यदूत म्हणून काम केले आहे. 

राजकारणात गेलेले काही निवडक सनदी अधिकारी

निवृत्त झालेल्या मर्जीतील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उपलोकायुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, मानवाधिकार आयोग, माहिती आयुक्त, राज्य विद्युत नियामक आयोग, सिकॉमचे मुख्याधिकारी अशा पदांवर केली जाते. तथापि, काही जणांना राजकीय क्षेत्राचे आकर्षण असते. काही वेळा पंतप्रधान, मुख्यमंत्रीही ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर राजकीय पक्षातील प्रवेशासाठी आणि निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्रवृत्त करतात. जुन्या काळात कर्तबगार आयसीएस अधिकारी म्हणून नावलौकिक झालेले चिंतामणराव देशमुख निवृत्तीनंतर १९५२ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारामुळे लोकसभा निवडणुकीत उभे राहिले आणि निवडून आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री झाले. १९६२ मध्ये मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहामुळे ज्येष्ठ आयसीएस अधिकारी सदाशिवराव बर्वे यांनी विधानसभा निवडणूक लढवली. विजयानंतर ते राज्याचे अर्थमंत्री झाले. १९७७ मध्ये निवृत्त झालेले आयएएस अधिकारी व्ही. सुब्रह्मण्यम १९८० ते १९८५ मध्ये कॉंग्रेस उमेदवार म्हणून मुंबईतील माटुंगा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. नंतर ते कॅबिनेट मंत्रीही झाले.  

परंतु राजकारणात प्रवेश केलेल्या निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीत यश मिळतेच असेही नाही. राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान जून १९९० मध्ये विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेवर दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवडून आले होते; परंतु काही वर्षांनंतर राज्यसभा निवडणुकीत त्यांना यशाने हुलकावणी दिली. राज्याचे माजी मुख्य सचिव तसेच दिल्लीचे माजी नायब राज्यपाल पी. जी. गवई यांनी निवृत्तीनंतर भाजपात प्रवेश केला होता. परंतु राजकारणातील प्रवेश त्यांना फारसा अनुकूल ठरला नव्हता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DT41Q
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना