शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

महागाईविरोधात काँग्रेसची ३१ ला सायकल रॅली

Monday, 29th January 2018 06:22:36 AM

गडचिरोली, ता.२९: पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने ३१ जानेवारीला जिल्हाभर सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहराध्यक्ष व नगरासेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव कुणाल पेंदोरकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड.गजानन दुगा, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, पुरुषोत्तम मसराम, श्री. सोनटक्के, आरिफ कनोजे, आरिफ शेख, पांडुरंग दुधबावरे, बाळू मडावी उपस्थित होते.

डॉ.उसेंडी म्हणाले, काँग्रेसची सत्ता असताना २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ११२ डॉलर प्रतिबॅरल होता आणि त्यावेळी पेट्रोलचा दर ६७ रुपये, डिझेल ५६ रुपये व घरगुती गॅसचा दर ३७७ रुपये होता. आता भाजपची सत्ता असताना कच्च्या तेलाचा दर ५६ डॉलर प्रतिबॅरल झाला आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात कच्च्या तेलाचा दर कमी होऊनही पेट्रोल ८१ रुपये, डिझेल ६७ रुपये दराने विकले जात आहे. गॅस ८१० रुपये दराने विकला जात आहे.  डाळींचे भावही प्रचंड वाढले आहेत. यावरुन सरकार नागरिकांची लूट करीत असून, महागाई कमी करण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहेत, अशी टीका डॉ.उसेंडी यांनी केली.

बँकेचे व्यवहार करतानाही ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. जनधन योजनेत किमान २ हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला ४३ रुपयांची कपात करुन हा पैसा सरकारच्या तिजोरीत भरण्याचे काम सुरु आहे. यामुळग गोरगरीब नागरिक अडचणीत येत आहेत. जाचक अटी व शर्तींमुळे मुद्रा योजनेतून कोणालाच कर्ज मिळेनासे झाले आहे. यामुळे ही योजना 'मुर्दा' योजना बनली आहे, असे डॉ.उसेंडी म्हणाले. यंदा रोगराईमुळे १५ ते २० टक्के उत्पादन होऊनही ते ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन दाखविण्यात आले. शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्याचे पैसे पीक कर्जातून कपात करण्यात आले. परंतु रोगराईमुळे पीक हातातून जाऊनही शेतकऱ्यांना एक पैसाही मिळाला नाही. उलट विमा कंपन्यांचा फायदा झाला.ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत कपात करण्यात आली असून, ती देण्यात येत नाही, असा आरोप डॉ.उसेंडी यांनी केला. 

येथील लोकप्रतिनिधी उद्योग यात्रा काढत आहेत. परंतु साडेतीन वर्षात जिल्ह्यात एकही उद्योग आला नाही. हे लोकप्रतिनिधी भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करीत आहेत, असे डॉ.उसेंडी म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
1151E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना