बुधवार, 19 डिसेंबर 2018
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ ची पदभरती स्थगित करा;अन्यथा जिल्हा कचेरीवर मोर्चा काढू-ओबीसी समाज संघटना व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा             प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यंदाच्या 'गडचिरोली जिल्हा गौरव' पुरस्काराचे मानकरी-गडचिरोली प्रेसक्लबचा निर्णय, ६ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान             जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप, जनजीवन विस्कळीत             शेतकरी कामगार पक्ष फेब्रुवारीत गडचिरोलीत घेणार विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद-अलिबाग येथील मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनिल धामोडे
जिल्हा प्रतिनिधी, दै. देशोन्नती, गडचिरोली
वाढदिवस : 19 डिसेम्बर
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

अरविंद सावकारांनी जीवाभावाची माणसं मिळवली हीच त्यांची शिदोरी-कुलगुरु डॉ.कल्याणकर

Saturday, 6th January 2018 11:56:37 AM

गडचिरोली, ता.६: गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही. अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्यात हे कौशल्य असून, त्यांनी जीवाभावाची माणसं मिळवली, हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी शिदोरी आहे, असे गौरवोद्गार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी काढले. 

गोंडवाना कला दालनात गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेचा "गडचिरोली जिल्हा गौरव" पुरस्कार सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना कुलगुरु डॉ.कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

प्रेस क्लबचे अध्यक्ष अरविंदकुमार खोब्रागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, प्रेसक्लबचे सचिव प्रा.अनिल धामोडे, एंजल देवकुले व्यासपीठावर उपस्थित होते.

कुलगुरु डॉ.कल्याणकर म्हणाले, जिल्हा सहकारी बँका ह्या राजकारणाचा अड्डा बनल्याची टीका करण्यात येते. परंतु अरविंद सावकारांनी राजकारणाबरोबरच समाजकारण व अन्य क्षेत्रातही मोठी कामगिरी केली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे म्हणाले की, सहकार क्षेत्र महाराष्ट्राएवढे जगात कुठेच रुजले नाही. सहकार क्षेत्रामुळेच आज महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य बनले आहे. सहकार क्षेत्रातून अनेक मंडळींनी राजकारणात मोठी उंची गाठली. अरविंद सावकार हे त्यापैकीच एक आहेत. पत्रकारांना तिहेरी भूमिकेतून जावे लागते. परंतु जिल्हा मागास असतानाही येथील पत्रकार आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असल्याबद्दल श्री.शिंदे यांनी पत्रकारांचे अभिनंदन केले. येथील आदिवासी बांधव साधे, सरळ व भोळे आहेत. जे नक्षलचळवळीत गेले आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारांनीही प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सत्काराला उत्तर देताना अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, आपण ३२ वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता पाहत आहोत. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत बराच बदल झाला आहे. पत्रकार अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करतात. परंतु हे करताना त्यांना भविष्यातील परिणामांची काळजी घ्यावी लागते. विध्वंसक लोक जीवावर उठतात. मात्र अशाही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार आपले कर्तव्य बेडरपणे बजावत असल्याने सामान्य नागरिकांनाही लढण्याची ताकद मिळते. पत्रकार जसे दुभंगलेली माणसं जोडण्याचे काम करतात, तसेच ते कुणाची उंची कमी करु शकतात. समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात, असे सांगून त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले.

आपण जीवाभावाचा लोकसंग्रह केला. तो टिकविण्याची प्रेरणा आपणास वडिलांकडून मिळाली. तत्कालिन चंद्रपूर जिल्ह्यात दळणवळणाच्या साधनांचा अभाव असताना अनेक कार्यकर्ते आमच्या आरमोरीतील घरी जेवायचे. कुरंडी येथील बारिकराव कुमरे गुरुजींचा अपघात झाला, त्यावेळी आपल्या वडिलांनी त्यांना १५ दिवस आमच्या घरी ठेवले होते. या गुरुजींना शासकीय आश्रमशाळेला ११ एकर जागा दान दिली, म्हणून वडिलांनी त्यांना आश्रय दिला, हे नंतर कळले, अशी आठवण अरविंद सावकारांनी यावेळी सांगितली.

लोकांनी पोरेड्डीवार परिवाराला ४० वर्षांपासून जपलं आहे. मी अनेक सुख-दु:ख पाहिले. परंतु डगमगलो नाही. मला माझ्या कुटुंबाविषयी प्रचंड आत्मविश्वास आहे. लहान भाऊ प्रकाश पोरेड्डीवार यांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे बऱ्याच गोष्टी करता आल्या. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात पुरस्कार मिळाल्याने मला प्रेम आणि मांगल्य मिळालं. पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असून, गालबोट लागेल, असे कृत्य मी करणार नाही, असे भावोद्गार अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी काढले.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना अरविंदकुमार खोब्रागडे यांनी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी पुरस्कार स्वीकारल्याने आमच्या पुरस्काराची उंची वाढल्याचे सांगितले. पोरेड्डीवारांच्या मागे वेगळे वलय असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावून गिनीज बwक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये सिकई मार्शल आर्ट या प्रकारात आपले नाव कोरणारी एंजल विजय देवकुले हिला पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच प्रेस क्लबचे सदस्य विलास दशमुखे हे पंचायत समितीचे उपसभापती झाल्याबद्दल त्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल धामोडे, संचालन महेश तिवारी, तर आभारप्रदर्शन मनोज ताजने यांनी केले. कार्यक्रमाला आ.क्रिष्णा गजबे, प्राचार्य डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित, प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, भाग्यवान खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शशिकांत साळवे, अनंत साळवे, श्रीहरी भंडारीवार, महेश काबरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E8OQR
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना