शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

भीमा कोरेगावप्रकरणी गडचिरोलीत चक्काजाम, जिल्हाभरात कडकडीत बंद

Wednesday, 3rd January 2018 01:37:29 AM

गडचिरोली, ता.३: भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज विविध संघटना व राजकीय पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गडचिरोलीत जोरदार प्रतिसाद मिळाला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अन्य भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनी तीव्र निदर्शने करुन समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दुपारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

गडचिरोली येथे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, भारिप बमसंचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत, जिल्हा परिषद सदस्य अॅड.राम मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश ताकसांडे, नगरसेवक रमेश चौधरी, ओबीसी कर्मचारी संघटनेचे प्रा.शेषराव येलेकर, बीआरएसपीचे डॉ.कैलास नगराळे, विलास कोडापे, भाकपचे कॉ.देवराव चवळे, विनोद झोडगे, भारिप बमसंचे बाळू टेंभुर्णे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा निमंत्रक रामदास जराते, सामाजिक कार्यकर्त्या मीनल चिमूरकर, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नगरसेवक सतीश विधाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन जांभुळकर, बहुजन समाज पक्षाचे रमेश मडावी, तसेच बामसेफ, भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच गडचिरोलीतील मुख्य चौकात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला अभिवादन करुन रॅली काढली. सर्वांनी बंदचे आवाहन केल्यानंतर शहरातील व्यापारी व दुकानदारांनी आपापली प्रतिष्ठाने बंद करुन प्रतिसाद दिला. शहरातील शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. यावेळी विविध वॉर्डातील शेकडो महिला व पुरुषांनी एकत्र येऊन चौकात मानवी साखळी तयार केली. यामुळे काही क्षण वाहतूक ठप्प झाली होती.

त्यानंतर प्रमुख आंदोलनकर्त्यांनी संबोधित केले. आंबेडकरी अनुयायांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले असून, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्वांनी केली. सरकार जातीयवाद्यांना पाठीशी घालत असून, सरकारने आंबेडकरी अनुयायांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलन सुरु असताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार हेही तेथे आले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करुन घटनेचा तीव्र निषेध केला. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ.वडेट्टीवार यांनी केली. निदर्शने केल्यानंतर दुपारी दीड वाजताच्या सुमारास पुन्हा चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे चारही मार्गाची वाहतूक बराच वेळपर्यंत ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक संजय सांगळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळल्याने अनुचित घटना घडली नाही.

गडचिरोलीप्रमाणेच आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली इत्यादी ठिकाणही कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SU6KH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना