गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

क्रीडा संमेलनाच्या नियोजनशून्यतेमुळे संतापले आमदार कृष्णा गजबे

Monday, 18th December 2017 06:37:41 AM

कुरखेडा, ता.१८: स्थानिक पंचायत समितीच्या वतीने येंगलखेडा येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला महोत्सवाच्या नियोजनशून्य आयोजनावर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे यांनी तीव्र संताप व्यक्त करून आयोजकांची चांगलीच कानउघाडणी केली

येंगलखेडा येथील हिरामण पांडव हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन काल (ता.१७) होणार होते. या संमेलनाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे व अन्य अतिथी नियोजित वेळी उपस्थित झाले. परंतु केवळ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिमुळे कार्यक्रमाच्या उद्घाटनाला विलंब होत असल्याचे लक्षात येताच आमदार गजबे यांनी क्रीडांगणाचा फेरफटका मारला. यावेळी कबड्डी स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या क्रीडांगणावर मोठेमोठे मातीचे ढेकूळ पाहून आमदार महोदय संतापले. त्यांनी ढेकूळ काढण्याच्या सूचना करून ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथे जमलेल्या नागरिकांशी विकासाबाबत चर्चा केली.

तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारा निधी अपुरा पडत असल्याची ओरड आयोजकांकडून नेहमी होत असते. यासाठी आपण जिल्हा विकास निधीतून प्रयत्न करणार असल्याचे आमदार गजबे यांनी सांगितले. मात्र मिळणारा निधी जेथे खर्च करायला पाहिजे, तेथे तो खर्च होताना दिसत नसल्याचे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली. क्रीडांगणावर खेळणाऱ्या बालकांची कुणी जबाबदारी घेणार आहे काय, असा प्रश्न उपस्थित करून बाहेर ठिकाणावरून आलेल्या खेडाळूंच्या निवासाची व्यवस्था करण्याचे सोडून पाहुण्याच्या आदरातिथ्यावर होणारा खर्च टाळला पाहिजे, कशाला हवेत फेटे? हे काही लग्नकार्य नाही, अशा शब्दात आमदार गजबे यांनी कानउघाडणी केली.

अध्यक्षीय भाषणात पंचायत समिती सभापती गिरीधारी तितराम यांनीही कार्यक्रमाच्या ढिसाळ आयोजनावर नाराजी व्यक्त करुन यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे बजावले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती मनोज दुनेदार, जिल्हा परिषद सदस्य गीता कुमरे, प्रभाकर तुलावी, नाजुक पुराम, भाग्यवान टेकाम, प्रल्हाद कराडे, गटविकास अधिकारी पी.एन.मरस्कोल्हे, गटशिक्षणाधिकारी प्रवींद्र शिवणकर, शिक्षण विस्तार अधिकारी यू.एन.राऊत, सत्यवान वाघाडे, केंद्रप्रमुख डोंगरवार, मेश्राम, कुमरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, पंचायत समिती सदस्य सुनंदा हलामी, संध्या नैताम, बौद्धकुमार लोणारे, श्रीराम दुगा, वर्षा कोकोडे, कविता गुरनुले, शारदा पोरेटी, माधुरी मडावी, सरपंच जनाबाई उसेंडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोमेश्वर बावनथडे, उपसरपंच मदन वट्टी, पोलिस पाटील युवराज बावनथडे, मुख्याध्यापक राजू बावनथडे उपस्थित होते.

संमेलनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजतापासून दुपारी ४.३० वाजतापर्यंत बसावे लागल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. कार्यक्रमाला बराच विलंब झाल्याने विद्यार्थ्यांनी वेशभूषा बदलली आणि त्यांना साध्या कपड्यांवरच नृत्य सादर करावे लागले. ४.३० वाजता उद्घाटनीय सामना खेळविण्यात आला. संचालनकर्त्याकडून लोकप्रतिनिधींच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याची बाब अनेकांना खटकली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IJATV
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना