शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

बाबासाहेबांचं नाव घेता, मग त्यांची करपद्धती शिकणार की नाही?-शरद पवार

Wednesday, 15th November 2017 06:26:03 AM

गडचिरोली, ता.१५: बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ व जलतज्ज्ञ होते. करपद्धती कशी असावी, याबाबत बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे. मात्र, सध्याच्या सरकारने २८ टक्क्यांपर्यंत करवाढ नेऊन ठेवली. एवढा कर लावायचा असतो काय, एकीकडे बाबासाहेबांचं नाव घेता, मग त्यांची करपद्धती का शिकत नाही, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उपस्थित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिनव लॉन येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, गुलाबराव गावंडे, आ.संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, गडचिरोलीचे माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, ऋतुराज हलगेकर उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी अर्थनीती, करपद्धती कशी असावी, याचं विवेचन केलं आहे. वीजनीती, वीजमंडळ कसं असावं, धरणं कशी असावी, याबाबतही त्यांनी उत्कृष्ठपणे विचार मांडले आणि भाक्रानांगल धरणाची निर्मिती बाबासाहेबांच्याच विचारधारेतून झाली. मात्र, सध्याच्या सरकारला बाबासाहेबांच्या अर्थनीतीचा विसर पडला आहे. व्यापाऱ्यांना मंदीचा फटका बसत आहेत. व्यापारी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यात नोटाबंदी आणि जीएसटीची भर पडली आहे. २८ टक्क्यांपर्यंत करवाढ करण्यात आली आहे. एवढा कर लावायचा असतो काय, असा सवाल शरद पवार यांनी केला. एवढा कर लावल्यास व्यापाऱ्यांमध्ये करचुकवेगिरीची भावना येऊ शकते. उद्योगांना खीळ बसली आहे. मग, देशाची संपत्ती वाढणार कशी? अलिकडे शिक्षणाचं प्रमाण वाढत असल्याचा आनंद आहे. पण सुशिक्षित युवक, युवतींच्या हाताला काम कुठे आहे? ३ वर्षांत जेवढी बेकारी वाढली, तेवढी ती यापूर्वी कधीच वाढली नव्हती. राज्यकर्त्यांनी ही संकटं गांभीर्याने घ्यावीत, असे पवार म्हणाले.

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना गायीची किंमत कळते, पण माणसाची किंमत कळत नाही, हे दुर्दैव आहे. गायीच्या नावाखाली गोरगरिबांच्या हत्या करायच्या असतात काय, यांना माणसांना मारण्याचा अधिकार कुणी दिला, असे प्रश्न उपस्थित केले. अलिकडे हे लोक काय खावे आणि काय खाऊ नये, हेदेखील सांगू लागले आहेत. सीमेवर लढणाऱ्या जवानांची अंडी किंवा मटन खाण्याची इच्छा झाली तर त्यांनी खाऊ नये काय, काय खावे आणि काय खाऊ नये हे वाराणसीचे लोक ठरविणार काय? धर्मनिरपेक्षता मानणाऱ्यांना यूपीत परवानगी नाही. ही भूमी यांच्या बापजादांची आहे काय, दुसऱ्यांना मारण्याचा अधिकार यांना घटनेनं दिला काय, अशा प्रश्नांचा पवारांनी भडिमार केला.

शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, अशी अवस्था आहे. परंतु कर्जमाफीनंतर सरकार चावडीवाचन करुन कर्ज असलेल्या शेतकऱ्याच्या अब्रूचा पंचनामा करीत आहे. त्यामुळे गावभर बदनामी होण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असा विचार त्याच्या मनात येत आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने आत्महत्या होत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली.

आपण कृषिमंत्री असताना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या गावी गेलो होतो. तेथून दिल्लीला परतल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली. त्यावेळी कोणतेही निकष लावले नाही. परिणामी आत्महत्या कमी झाल्या, याची आठवण पवारांनी करुन दिली.

आपल्या काळात शेतमालाला चांगला भाव दिला. त्यावेळी भारत तांदूळ पिकविणार क्रमांक १ चा व गहू, कापूस व साखर पिकविणारा क्रमांक २ चा देश होता, असे पवारांनी अभिमानाने सांगितले. शेतमालाच्या किमती वाढविल्या तर महागाई वाढेल, असे काही लोक म्हणतात. मग, सरकार कशासाठी आहे, असा प्रश्न शरद पवार यांनी केला. एकंदरित या सरकारच्या कालावधीत कुणीच आनंदी नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वांनी एकीची ताकद दाखवावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

आर.आर.पाटील यांनी गडचिरोलीला खूप काही दिले

स्व. आर.आर.पाटील यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी खूप काही केले. त्यांनी ५ वर्षांत ५५ हजार पोलिसांची भरती केली. आदिवासी मुलांना विशेषत्वाने पोलिस दलात भरती केले. शहीद कुटुंबीयांना ५ लाखांची मदत सुरु केली. राज्यात कुठेही नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी येथे दोन पोलिस जिल्हे निर्माण करुन लोकांच्या सुरक्षेची हमी घेतली. स्वच्छ राहण्याचा आदर्श आबांनी कृतीतून दाखवून दिला. परंतु हा माणूस फार काळ जगू शकला नाही, याचे दु:ख वाटते, असे पवार म्हणाले. याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोलीत आर.आर.पाटील यांचा पुतळा उभारण्याचा मनोदय व्यक्त करताच, शरद पवार यांनी पुतळ्यासाठी आपण नक्की मदत करु आणि अनावरणालाही येऊ, अशी ग्वाही दिली.

सुरुवातीला धर्मरावबाबा आत्राम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शरद पवार यांचा भव्य पुष्पहार घालून तसेच आदिवासींची बांबूची टोपी व तिरकमठा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम व रवींद्र वासेकर यांचीही भाषणे झाली. ऋषिकेश पापडकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UI4F4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना