शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अभाविपने दाखविले शिक्षणमंत्र्यांना काळे झेंडे

Wednesday, 4th October 2017 07:42:53 AM

गडचिरोली, ता.४: विद्यापीठाच्या निवडणुका घेण्याचा केलेला केवळ गाजावाजा आणि शिक्षणासंदर्भात भरीव कार्य करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून आज भाजपची पितृसंघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात नारेबाजी करुन काळे झेंडे दाखविले.

गोंडवाना विद्यापीठाच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, तसेच वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज गडचिरोलीत आले होते. यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काळे झेंडे दाखवून नारेबाजी केली. 

'शिक्षणमंत्री तुम होश में आओ, कुछ काम करो, वर्ना खुर्सी खाली करो', अशा घोषणा देत अभाविप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. याप्रकरणी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या अभाविप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कार्यक्रम संपेपर्यंत स्थानबद्ध केले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

संध्याकाळी अभाविपने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मागील ३ वर्षांपासून शिक्षणमंत्र्यांनी विद्यापीठ निवडणुका लोकशाही पद्धतीने होणार असल्याचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात काहीच केले नाही. केवळ थापा मारुन विद्यार्थी नेतृत्व तयार होणार नाही. शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण या विषयावर काहीच काम केले नाही. त्यामुळे आपण काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचे अभाविपने म्हटले आहे. 

विद्यापीठाच्या निवडणुका घेऊन विद्यार्थी नेतृत्वास चालना मिळेल, असे काम करावे. केवळ घोषणा आणि आश्वासनांची खैरात वाटू नये. सहावा वर्धापन दिन येऊनही विद्यापीठ परिसर सुरु करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाला जागा मिळत नाही, ही शिक्षणमंत्र्यांची नामुष्की आहे. बहुउद्देशीय विद्यापीठ केवळ कागदावरचे राहू नये, तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विकास साधण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, असेही अभाविपने म्हटले आहे.

विद्यापीठाच्या सेमिस्टर पद्धतीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षा देण्यापुरते शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण व्हावे व त्यांचा विकास साधण्याकरिता आधी सेमिस्टर पद्धती बंद करावी, अशी मागणीही अभाविपने केली आहे. या आंदोलनात हर्षल गेडाम, साहिल धाईत, न्यूटन मंडल, नगर संघटनमंत्री तेजस मेहरकुरे, सूरज काटवे, चेतन कोडवते, चिराग नंदेश्वर, गोपाल देशमुख, अतुल मडावी, योगेश ताराम सहभागी झाले होते.

अभाविप ही भाजपची मूळ संघटना असून, या संघटनेतूनच गेलेले अनेक जण भाजप व राज्य सरकारमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. परंतु आज अभाविपनेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना काळे झेंडे दाखविल्याने अभाविप राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाबाबत नाराज असल्याचे दिसून येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E47KA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना