रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

गोंडवाना विद्यापीठाने स्वत:च्या पायावर उभे राहणारे विद्यार्थी घडवावे:सुधीर मुनगंटीवार

Wednesday, 4th October 2017 01:23:18 PM

गडचिरोली, ता.४: गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, युवतींमध्येही प्रचंड क्षमता आहे. परंतु त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने पारंपरिक शिक्षण न देता रोजगाराभिमुख व विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे वित्त व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

गोंडवाना विद्यापीठाच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्‌यापीठाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी एएसआर नायक, प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.विकास आमटे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुलांच्या, तर विनोद तावडे यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर अतिथींची भाषणे झाली. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पुस्तक वाचणे म्हणजे ज्ञान नाही. एकेविसाव्या शतकात ज्ञानाची व्याख्या बदलली आहे. त्यामुळे कल्पकता आणि नवनिर्मिती करणारे शिक्षण विद्यापीठांमधून देणे गरजेचे आहे. आज चीनची विद्यापीठे सरकारचे उत्पन्न वाढविणारी केंद्रे झाली असून, ते दरवर्षी चीनी सरकारला ५ ते १० हजार कोटींचे उत्पन्न देतात, असे श्री.मुनगंटीवार म्हणाले. आपण आपला मुलगा आयआयटीत शिक्षण घेत असल्याचे अभिमानाने सांगतो. मात्र, जगातील टॉप २०० महाविद्यालयांमध्ये भारतातील एकही महाविद्यालय नाही, अशी खंत श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. गोंडवाना विद्यापीठाला जे हवे आहे, ते नककी देऊ, मात्र त्यासाठी वारंवार पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असेही श्री.मुनगंटीवार यांनी कुलगुरुंच्या लक्षात आणून दिले.

उच्च व तंत्रशिक्षण तसेच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ हे नवीन असल्याने या विद्यापीठाला पायाभूत सुविधा देण्याची बाब सरकारच्या अजेंड्यावर आहे. विद्यापीठाला दोनशे एकर जमीन व निधीही लवकरच मिळेल. त्यासाठी इतर विद्यापीठांसाठी असलेल्या निकषांमध्ये शिथिलता देऊ. मात्र, त्यासाठी टास्क फोर्स निर्मितीची आवश्यकता आहे. या महिन्यात राज्यपालांच्या बैठकीत विद्यापीठाचे प्रश्न निकाली काढू, असे श्री. तावडे म्हणाले. लोककला, बांबू व अन्य वनोपजांवर आधारित अभ्यासक्रम निर्माण करुन, तसेच क्रीडा क्षेत्राला अधिक विकसित करुन आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली संधी द्यावी. असे केल्यास स्पोर्ट युनिव्हर्सिटी म्हणून गोंडवाना विद्यापीठ नावारुपास येईल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडील कौशल्य व वेळेचा सदुपयोग केल्यास आदर्श गावे निर्माण होण्यास वेळ लागणार नाही, असेही श्री.तावडे म्हणाले.

याप्रसंगी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.विकास आमटे यांना राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते 'जीवन साधना गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महाविद्यालये, कर्मचारी व विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, तर आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव दीपक जुनघरे यांनी केले.

क्षणचित्रे......

१)विद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेत तसेच मंचावरील बॅनरवर अतिथींची नावे लिहितांना प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही.

२) कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. परंतु त्यांनी प्रास्ताविक भाषण केले. अर्धा तास त्यांनी विद्यापीठाच्या समस्यांचा रटाळ पाढा वाचला.

३) या कार्यक्रमात विद्यापीठाचे कर्मचारी व काही महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यातील काही जण आपल्या पत्नीला घेऊन मंचावर गेले, तर काही जणांनी अख्खी फॅमिलीच स्टेजवर चढवून फोटो सेशन केले. हा सत्कार सपत्नीक व सहकुटुंब नव्हता, याचे भान शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी ठेवले नाही, याबाबत उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
HF74Q
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना