शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

'सबका साथ, सबका विकास' या ब्रीदनुसार जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध-अम्ब्रिशराव आत्राम

Tuesday, 15th August 2017 05:31:50 AM

गडचिरोली, ता .१५: 'सबका साथ, सबका विकास' या ब्रीदनुसार जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले.
 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी एएसआर नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शंतनू गोयल, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.बिपीन इटनकर, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक श्री.एटबॉन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
 
पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम पुढे म्हणाले, 'सबका साथ, सबका विकास' या ब्रीदनुसार राज्य सरकार काम करीत असून, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्यात येत आहे. शेतकरी संकटात असल्याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे यंदा विक्रमी साडेनऊ लाख क्विंटल धानखरेदी शक्य झाली. त्यातून शेतकऱ्यांना १३० कोटी रुपये वाटप झाले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १५२ गावे जलयुक्त झाली असून, यंदा १६९ गावांची निवड झाली आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून शेकडो गावांचे सिंचन झाले आहे. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याने उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्षलागवड केली. आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांसाठी १० वसतिगृहे सुरु करण्यात आली आहेत. आणखी ८ वसतिगृहांचे लोकार्पण लवकरच होणार असल्याची माहितीही श्री.आत्राम यांनी दिली. 
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील २३, कोरची तालुक्यातील १३ व अहेरी तालुक्यातील ८ गावांमध्ये ऑनलाईन सातबारा देण्यासाठी संगणकीय प्रणालीचे काम पूर्ण झाले असून, आजपासून ऑनलाईन सातबारा देण्यास प्रारंभ होत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भिमराव काळे, मोतीराम मडावी, मल्लेश केडमवार, जितेंद्र मारगाये, कॉन्स्टेबल गजेंद्र हिराजी सौंजाळ यांचा पालमंत्र्यांनी सत्कार केला. शहीद दोगे डोलू आत्राम(मरणोत्तर) यांच्या पत्नी राशी दोगे व शहीद स्वरुप अशोक अमृतकर(मरणोत्तर) यांच्या आई कल्पना अमृतकर यांनाही पालकमंत्र्यांनी सन्मानित केले. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या धानोरा तालुक्यातील जांभळी, द्वितीय क्रमांक प्राप्त कुरखेडा तालुक्यातील खरकाळा व तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेल्या मालदुगी ग्रामपंचायतींचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे व कमु तायडे यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
PSV11
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना