/* */
रविवार, 4 डिसेंबर 2022
लक्षवेधी :
  गडचिरोली पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात: आरोपीस अटक न करण्यासाठी मागितली साडेतीन हजार रुपयांची लाच             कोरची येथील एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहकांची ५ लाखांची फसवणूक, दोघांना अटक             अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखालील विदर्भपूरआयोग५ डिसेंबरला गडचिरोलीत: पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार             गृहकरात केलेली अवाजवी वाढ कमी करा: राष्ट्रवादीचे नेते विजय गोरडवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी           

स्मरण नेताजी राजगडकरांचे

Tuesday, 18th July 2017 01:09:00 AM

 

गडचिरोली, ता.१८:वयाची चाळीशी ओलांडलेल्या विदर्भातील लोकांना 'नेताजी राजगडकर' हे नाव ज्ञात नसेल, असा एखादाच मनुष्य सापडेल. तो काळ 'आकाशवाणी'चा सुवर्णकाळ होता. संध्याकाळी ६.५० च्या नागपूर आकाशवाणीच्या बातम्या ऐकण्यासाठी लोक अक्षरश: वेड्यासारखे रेडिओजवळ येत. रेडिओही फार कमी जणांच्या घरी असायचा. अशावेळी एखाद्याच्या घरी गर्दी करण्याशिवाय पर्याय नसायचा. आज आपण टीव्हीजवळ गर्दी करतो. कारण टीव्हीवर चालतीबोलती माणसे दिसतात. रेडिओवर कुणीच दिसत नव्हतं. तरीही लोक रेडिओपुढे गोळा होत. बातम्यांची वेळ झाली की, 'आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नेताजी राजगडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे', हे शब्द कानी पडायचे. नेताजींचा नुसता आवाज ऐकला तरी दिवसभर काबाडकष्ट करुन रेडिओजवळ आलेल्या गोरगरिबांचे मन सुखावून जायचे. आज नेताजी राजगडकर हयात नाहीत. पण, त्यांचा कणखर आवाज आजही कानात गुंजतो.

नेताजी नुसते वृत्तनिवेदकच नव्हते, तर धारदार वक्तृत्वाचेही धनी होते. त्यांचे उच्चार जेवढे स्पष्ट असायचे, तेवढेच व्याकरणही अचूक असायचे. मराठीबरोबरच इंग्रजी आणि हिंदी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. भाषण आणि लेखनातून हे प्रभुत्व व्यक्त होत असायचे. साहित्यिक म्हणून नेताजींकडे जशी शब्दसंपदा होती, तसाच त्यांचा मित्रसंचयही समृद्ध होता. कम्युनिस्ट चळवळीतून आलेले नेताजी आंबेडकरी चळवळीत स्थिरावले. त्यामुळे त्यांचे प्रत्येक भाषण, लेखन आणि आंदोलनाला आंबेडकरी कंगोरे असायचे. तो काळ १९८९-९० चा होता. देशाच्या राजकारणात जनता दल नावाचा पक्ष लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर होता, १९९० मध्ये राज्य विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी नेताजींनी आकाशवाणीच्या नोकरीला ठोकर मारुन राजकारणात उडी घेतली. नेताजी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघातून उभे राहिले आणि प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले. त्यानंतर १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक आली. नेताजी राजगडकरांना जनता दल, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट आणि अन्य पुरोगामी पक्षांनी तत्कालिन चिमूर लोकसभा क्षेत्रातून उभे केले. काँग्रेसतर्फे विलास मुत्तेमवार आणि भाजपकडून प्रा.महादेवराव शिवणकर रिंगणात होते. त्यावेळी सर्वच पक्षांचे लोक नेताजी राजगडकरांचा विजय होईल, असे खात्रीने बोलायचे. वातावरणच तसे होते. अगदी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजनांनीदेखील चिमूर क्षेत्रात तिसऱ्या आघाडीची बाजू प्रबळ असल्याचे वक्तव्य केले होते. नेताजींच्या प्रचारार्थ ब्रम्हपुरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर व्ही.पी.सिंग यांची सभा झाली. जाहीर सभेत उपस्थित अफाट गर्दीतल्या लोकांकडे पाहून व्ही.पी.सिंग म्हणाले, 'मुझे लगता है आपने अपना नेता चून लिया है'.

नेताजी विजयाच्या दिशेने आगेकूच करीत होते. पण, तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि सहानुभूतीच्या लाटेत विलास मुत्तेमवार विजयी झाले. त्यानंतर काळाच्या ओघात नेताजी हळूहळू राजकारणातून बाद होत गेले.

नेताजींचे सामाजिक आणि राजकीय कर्तृत्व अविस्मरणीय आहे. जनता दलाचे आमदार असताना माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, रामविलास पासवान अशा मोठ्या राष्ट्रीय नेत्यांचे 'नेताजी' हे लाडके कार्यकर्ते होते. दलित, आदिवासी, बहुजन, कष्टकरी अशा उपेक्षित समुदायासाठी त्यांनी आपली वाणी आणि लेखनी झिजविली. १८ जुलै हा त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

--जयन्त निमगडे

संपादक

गडचिरोली वार्ता डॉट काम


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X9UO1
  © 2014 - 2022 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना