गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

आदिवासीबहुल जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याचे आरोग्य विभागाचे आदेश

Thursday, 22nd June 2017 12:01:30 AM

 

गडचिरोली, ता.२२: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय आढावा बैठक घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ मे रोजी जिल्हानिहाय आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत पालघर, नंदूरबार, नाशिक, अमरावती, गोंदिया व गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी रिक्त पदे तत्काळ भरण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १७ जून रोजी आरोग्य सेवा संचालकांनी प्रस्ताव तयार केला. त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची(गट 'अ') रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना १९ जून रोजी पाठविलेल्या पत्रान्वये दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या तालुक्यांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरावयाची आहेत. उपरोक्त जिल्ह्यांमध्ये सेवा देण्यास तयार असणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग वा बिंदूनामावली लक्षात न घेता त्यांची नियुक्ती करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

महिला रुग्णालयाची इमारत धूळखात

डॉक्टरांच्या रिक्त पदांचा फटका जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोलीवासीयांनाही बसत आहे. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करुन महिला व बाल रुग्णालय उभारण्यात आले आहे. दोन वर्षांपासून रुग्णालयाची इमारत तयार आहे. परंतु अद्याप तेथे डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांना मान्यता दिल्याचे सांगून लोकप्रतिनिधी वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या 'थापा'ना वर्ष पूर्ण होऊनही एकही पद न भरण्यात आल्याने नागरिकांमध्ये स्थानिक आमदाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4UGTR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना