गुरुवार, 18 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

१२ पैकी ५ पंचायत समित्यांवर काँग्रेस

Sunday, 14th September 2014 09:39:28 AM

 गडचिरोली, ता. १४ : आज (ता.१४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने १२ पैकी ५ पंचायत समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले, तर भाजपाला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोनच पंचायत समित्या जिंकता आल्या. नागविदर्भ आंदोलन समिती आणि सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या गटाने प्रत्येकी एका पंचायत समितीवर विजय संपादन केला. विशेष म्हणजे, १२ पैकी तब्बल ८ पंचायत समित्यांवर महिला सभापती विराजमान झाल्या आहे.

गडचिरोली : गडचिरोली पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे देवेंद्र भांडेकर, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर गद्देवार यांची निवड झाली. ९ सदस्यीय या पंचायत समितीत यापूर्र्वी राँकाच्या सविता कावळे सभापती, तर काँग्रेसचे देवेंद्र भांडेकर उपसभापती होते. यावेळी केवळ खांदेपालट झाला. मात्र, सविता कावळे यांचा पत्ता कट करण्यात आला.

धानोरा : नऊ सदस्यीय धानोरा पंचायत समितीत सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कल्पना वड्डे या सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या गटाच्या सहकार्याने ईश्वरचिठ्ठीने सभापती झाल्या, तर चंदेल गटाच्या मायाताई मोहुर्ले यांची उपसभापतिपदी निवड झाली. या पंचायत समितीत काँग्रेसचे ६ व सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या गटाचे २ सदस्य आहेत. पूर्वी काँग्र्रेसच्या कल्पना वड्डे सभापती पदावर कार्यरत होत्या. मात्र, आज पार पडलेल्या  सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला गटबाजीचा सामना करावा लागला. सभापती कल्पना वड्डे  व अन्य एक सदस्य चंदेल यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने काँग्रेसचे संख्याबळ ६ वरून ४ झाले. त्यामुळे सभापती व उपसभापती पदाची निवड ईश्वर चिठ्ठीने करण्यात आली. त्यात कल्पना वड्डे सभापती, तर मायाताई मोहुर्ले यांची उपसभापतीपदी निवड झाली.

आरमोरी : १० सदस्यसंख्या असलेल्या आरमोरी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ७ आणि शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. सभापतिपदी काँग्रेसच्या सविता भोयर, तर उपसभापतीपदी चंदू वडपल्लीवार यांची अविरोध निवड झाली.

 कुरखेडा : कुरखेडा पंचायत समितीवर पूर्वीप्रमाणेच काँग्रेस व चंदेल गटाचे वर्चस्व कायम राहिले. आज घेण्यात आलेल्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शामिना उईके यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी चंदेल गटाचे बबन बुध्दे यांना पुन्हा संधी देण्यात आली. 

देसाईगंज : ६ सदस्यीय देसाईगंज पंचायत समितीच्या सभापतिपदी पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेच्या व भाजप समर्थीत प्रीती शंभरकर यांची सभापतिपदी, तर काँग्रेसचे नितीन राऊत यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. 

चामोर्शी :  १८ सदस्यीय चामोर्शी पंचायत समितीमध्ये सभापतिपदी भाजपाच्या शशीबाई चिळंगे, तर उपसभापतिपदी भाजपाचेच केशव भांडेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. 

एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपाचे दीपक कुलसंगे यांनी राकाँच्या ललीता मट्टामी यांचा ३ विरूध्द २ मतांनी पराभव केला.  उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चरडुके यांची ईश्वर चिट्टीने निवड झाली.

अहेरी :   १२ सदस्य संख्या असलेल्या अहेरी पंचायत समितीच्या सभापती म्हणून नाविसच्या रविना गावडे यांची वर्णी लागली, तर उपसभापतिपदी  आविसच्या सोनाली कंकडालवार यांची निवड झाली. 

मुलचेरा :  ४ सदस्य संख्या असलेल्या मुलचेरा पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव कुसनाके, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्याच आशा निखुले यांची निवड झाली. 

सिरोंचा :  ८ सदस्य संख्या असलेल्या सिरोंचा पंचायत समितीच्या सभापती म्हणून लालूबाई मडावी, तर उपसभापतिपदी अब्दूल रहीम शेख यांची निवड झाली. दोघेही काँग्रेसचे आहेत.

कोरची :   ४ सदस्य संख्या असलेल्या कोरची पंचायत समितीच्या सभापतिपदी सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या गटाचे अवधराम बागमूळ, तर उपसभापतिपदी चंदेल गटाचे गोविंदराव दरवडे यांची निवड झाली.

भामरागड : येथील पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपाच्या रंजना उईके, तर उपसभापती म्हणून भाजपाच्याच मालू मडावी यांची निवड झाली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E0XRH
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना