गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

लोकांना हिंसा नको, संपन्नता हवी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Friday, 12th May 2017 02:25:43 AM

 

गडचिरोली, ता.१२: जिल्ह्यातील लोकांना बंदुका व हिंसा नको, तर संपन्नता हवी असून, ती घराघरात पोहचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लॉयड मेटल्सच्या बहुचर्चित लोहप्रकल्पाचे भूमिपूजन चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे आज श्री. फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा.अशोक नेते, आ.मितेश भांगडिया, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता भांडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, प्रमोद पिपरे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी एएसआर नायक, लॉयड मेटल्सचे संचालक अतुल खाडिलकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मागेल त्याला विहीर देण्याची सरकारची योजना असून, गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधेसाठी २३०० विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. या विहिरींवर वीजपंपही देण्यात आले आहेत. अलिकडेच बांबू आणि मोहफुलांना वनविभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बांबू क्रॉफ्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे विकासाची गती वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

लॉयड मेटल्सने सुरजागड पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन सुरु केले. आता या कंपनीने कोनसरी येथे लोहप्रकल्प सुरु केल्याने नागरिकांना रोजगार मिळणार आहे. कंपनीने स्थानिकांनाच रोजगार दिला पाहिजे, असा आमचा आग्रह असून, अपवादात्मक स्थितीतच दुसऱ्यांना रोजगार द्यावा, असे श्री.फडणवीस म्हणाले. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी कोनसरी परिसरात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी करताच लॉयड मेटल्सचे संचालक अतुल खाडिलकर यांनी आलापल्लीचे आयटीआय लॉयड मेटल्सने दत्तक घेतल्याची माहिती दिली. याबद्दल फडणवीस यांनी खाडिलकर व लॉयड मेटल्सचे कौतूक केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जिल्ह्यातील नैसर्गिक संपदेचा फायदा इथल्याच लोकांना झाला पाहिजे. लोकांना बंदुका व हिंसा नको, तर संपन्नता हवी आहे आणि सरकार ती पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारने वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे काम सुरु केले असून, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करु, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रेल्वेचा विषय केंद्रसरकारचा असला, तरी राज्य सरकार त्याकडे गांभीर्याने बघत असून, रेल्वे मंचेरियलपर्यंत नेऊन हैद्राबादला जोडू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते, अतुल खाडिलकर यांचीही भाषणे झाली.

यावेळी लोहप्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करुन त्यांचा गौरव करण्यात आला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
M0EE5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना