गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा

Tuesday, 25th April 2017 01:27:42 AM

 

भामरागड, ता.२५: येथील ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ.जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रभारी वैद्यकीय अधीक्षकही गायब झाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा पूर्णपणे ढेपाळली आहे. आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याने नागरिक संतापले असून, त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात काल(ता.२४)जिल्हा परिषद सदस्य अॅड. लासू नोगोटी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी तहसीलदारांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले. निवेदनात म्हटले आहे की, डॉ.आर.एल.जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शृंगारे अचानक पसार झाले. सद्य:स्थितीत या रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे संपूर्ण आरोग्यसेवा ढेपाळली आहे. यासंदर्भात जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.खंडाते यांना अवगत करण्यात आले. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत. अलिकडेच एका पिसाळलेल्या कुत्र्याने काही नागरिकांचा चावा घेतला. परंतु डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही, असेही तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

डॉ.जामी यांचा मृत्यू झाला, त्यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे डॉ.जामी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सर्व मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे, ग्रामीण रुग्णालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्या शिष्टमंडळाने केल्या. मागण्या मंजूर न केल्यास ग्रामीण रुग्णालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा अॅड.लालसू नोगोटी यांनी दिला. शिष्टमंडळात चिन्ना महाका, राजेंद्र कोठारे, गोविंद चक्रवर्ती, पठाण, गोई कोडापे, बेबी पोरतेट, संतोष सिडाम यांचा समावेश होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ER5CB
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना