रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

सरकारच्या सहकार्याशिवाय लोकबिरादरीने जिजगावात आणले 'अच्छे दिन'!

Sunday, 23rd April 2017 02:40:50 AM

 

गडचिरोली, ता.२२: अभावग्रस्त लोकांसाठी काम करण्याची जबर इच्छाशक्ती असली की, अख्ख्या गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील 'भाव' कसे बदलतात, हे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील ध्येयवेड्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे. अनिकेत आमटे यांच्या पुढाकारातून आदिवासीबहुल जिजगाव येथील घराघरात पिण्याच्या शुद्ध पाण्याचे नळ कसे पोहचले, त्याची ही कहाणी....

डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांचा समाजसेवेचा काटेरी प्रवास सर्वश्रूत आहेच. आता त्यांचे चिरंजीव अनिकेत आमटे हेदेखील तशाच वाटेचे प्रवासी झाले आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी नक्षलग्रस्त नेलगुंडा गावात साधना विद्यालयाची झालेली सुरुवात, हे अनिकेत यांच्या नेतृत्वातील पहिले मोठे कार्य. आता एकेक गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिजगाव या गावाची निवड करण्यात आली. भामरागडपासून साधारणत: २५ किलोमीटर अंतरावरील जिजगाव हे गाव ८५० लोकवस्तीचे आहे. संपूर्ण आदिवासीबहुल. मुलभूत सुविधांचा तसा येथे अभावच. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, पण तीही असून नसल्यासारखीच. मात्र, मुलांमध्ये शिक्षणाची अभिरुची आहे. त्यामुळे कुणी लोकबिरादरीच्या आश्रमशाळेत शिकतो, तर कुणी शासकीय आश्रमशाळेत. गावातील अजय सीताराम मडावी हा मुलगा अलिकडेच इंजिनियर झाला. अजय हा जिजगावचा पहिला इंजिनियर. शिकून मोठे झालेला कुणी यूपीएससीचा अभ्यास करतोय, तर कुणाला एमपीएससी खुणावतेय. पण, गावातील भौतिक परिस्थिती मात्र जैथे थे आहे. प्रशासनाच्या योजना गावाला हुलकावणी देऊन जातात. म्हणूनच की काय गावातील नागरिकांना हातपंपाचे पाणी प्यावे लागत होते. या हातपंपाची गोष्टही तशी मजेशीर आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रशासनातर्फे हातपंपावर मोटार बसविण्यात आली. परंतु ज्या दिवशी मोटार लावण्यात आली, त्या दिवसापासून ती तब्बल तीन वर्षे बंद होती. त्यामुळे गावकऱ्यांचे विशेषत: महिलांचे हाल होत होते. पावसाळ्यात गढूळ पाणी प्यावे लागत होते. एक दिवस सीताराम मडावी हे अनिकेत आमटे यांच्याकडे आले. त्यांनी पाणीटंचाई झळ सांगितली. त्याच दिवशी अनिकेतनी विडा उचलला-जिजगावला शुद्ध पाणी देण्याचा. साडेआठशे लोकवस्तीच्या लोकवस्तीला पिण्याचे शुद्ध पाणी द्यायचे म्हणजे प्रचंड खर्चाची बाब. त्यासाठी अनिकेतनी वर्गणी गोळा केली. ५० हजार लिटर पाण्यासाठी देशभरातील हितचिंतकांनी एका आवाजात निधीचे 'पाट' लोकबिरादरीकडे वळते केले. सामाजिक बांधिलकी म्हणून गावकऱ्यांनाही लोकवर्गणीची हाक देण्यात आली. त्यांनीही पदरमोड करुन १ लाखांचा निधी गोळा केला.

त्यानंतर सर्वप्रथम काम सुरु झाले ते माजी मालगुजारी तलावाच्या खोलीकरणाचे. पुरातन असलेल्या ४० एकरातील या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात झाली. तलाव खोल झाला, मोठी पाळही बांधली. यामुळे तलावात भरपूर पाणी तर साचलेच, शिवाय गावकऱ्यांच्या हाताला काम मिळाले. मग, तलावाचे पाणी गावात आणण्याचा विषय सुरु झाला. त्यासाठी यंदा गावात ५० हजार लिटरची उंच टाकी बांधण्यात आली. पाईपलाईन टाकून सौरउर्जा लावण्यात आली आणि गावातील ९० घरांमध्ये नळ पोहचले. आता भर उन्हाळ्यातही जिजगावचे लोक शुद्ध पाणी पिऊ लागले आहेत. जेथे घराघरांत नळाचे पाणी पोहचले, असे जिजगाव हे भामरागड तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. आता अनिकेत यांना गावकऱ्यांकडून एकच अपेक्षा आहे-गावकऱ्यांनी किमान आठवड्यातून एकदा टाकीची स्वच्छता करण्याची आणि नियमित देखभाल करण्याची.

पाण्याची समस्या सोडविण्यापूर्वी गावकऱ्यांनी शौचालय व स्वच्छतागृहाचा नियमित वापर करावा, अशी लोकबिरादरीची अपेक्षा होती. परंतु या दोन्ही बाबी पाण्याशी निगडित असल्याने आधी पाण्याची समस्या सोडविण्यात आली. नंतर शौचालय आणि स्वच्छतागृहांचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याचे अनिकेत आमटे यांनी 'गडचिरोली वार्ता'ला सांगितले. 

तलाव खोलीकरणामुळे तीन गोष्टी साध्य झाल्या. शेतीच्या सिंचनाची सोय झाली, पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले आणि हागणदारीमुक्तीकडे गावाची वाटचाल सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण योजनेसाठी अनिकेत आमटे यांनी खूप परिश्रम घेतले. दीड वर्षांपूर्वी शिर्डीहून लोकबिरादरीत आलेले अशोक गायकवाड यांनीही प्रत्यक्ष देखभाल करुन योजना पूर्णत्वास नेली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास मनोहर यांचाही जिजगावच्या मातीला स्पर्श झाला. गावात समाजमंदिराचे कामही सुरु झाले आहे.

आम्हाला जिजगावला आदर्श गाव बनवायचे आहे. त्यामुळे पेयजलाच्या योजनेला सरकारने मल्टीप्लाय करावे, अशी साधी अपेक्षा अनिकेत आमटे यांनी व्यक्त केली. सरकारच्या सहकार्याशिवाय आदिवासीबहुल गावात कसे 'अच्छे दिन' येऊ शकतात, याचे हे उत्तम उदारहणच नाही काय?


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LDTKO
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना