गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

महिलांनी निर्भीडपणे पुढे यावे: शाहीन हकीम, जयश्री खोंडे यांचे आवाहन

Wednesday, 8th March 2017 06:10:20 AM

 

विधात्याची, नवनिर्माणाची

कलाकृती तू...

एक दिवस तरी स्वत:च्या

अस्तित्वाचा साजरा कर तू....!

जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हे आवाहन 'गडचिरोली वार्ता' तर्फे समस्त महिलांना करीत आहोत. अनेक ठिकाणी महिला दिन साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणासंदर्भात अहेरी येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खोंडे व शाहीन हकीम यांना काय वाटते, हे जाणून घेतले पत्रकार सुरेंद्र अलोणे यांनी.

प्रत्येक क्षेत्रात महिलांची उत्तुंग भरारी-शाहीन हकीम, अहेरी

पुरुषप्रधान देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आगेकूच करीत आहेत त्यामुळे महिला भगिनींचे कार्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया अहेरी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.शाहीन बबलू हकीम यांनी व्यक्त केली.

शाहीन हकीम म्हणाल्या की, आज अनेक महिला व युवती कौटुंबिक जबाबदारी चोखपणे सांभाळून राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव कमवीत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही महिलांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव लौकीक केले आहे. हेच प्रत्येक महिलेकरिता प्रेरणादायी आहे. आज महिला वेगवेगळ्या कार्यात सक्रिय सहभाग दाखवून पुरुषांना लाजवितात, हीच खऱ्या अर्थाने महिला सक्षम असल्याची ओळख आहे. आता महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नसून, पुरुषांच्या बरोबरीने जात आहेत, ही प्रत्येक महिलेसाठी अत्यंत सुखद व आनंदाची बाब आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रात महिलांची उत्तुंग भरारी आहे.

खास करून महिला अजून आपल्या स्वतःच्या सर्वांगिण विकासासाठी संघटीत झाल्यास व नेहमी 'गेट टूगेदर' केल्यास सोने पे सुहागा होतो. दरवर्षी मकरसंक्रांत व सांस्कृतिक समारंभाचे औचित्य साधून वनवैभव शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आपण महिलांचे भव्य कार्यक्रम व महिला मेळावा घेत असतो. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील सुजाण व जाणत्या महिलांनी हिरीरिने सहभाग दर्शवावा, अशी अपेक्षा व्यक्त करून शाहीन हकीम यांनी समस्त महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांनी आता निर्भीडपणे पुढे यावे-.जयश्री खोंडे,अहेरी.

महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात निर्भीडपणे पुढे येण्याची गरज आहे. महिलांच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवीत असून, त्यांनी  सोयी, सवलतीही देत आहे. त्यांचा फायदा घेऊन महिलांनी सक्षम व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेच्या जिल्हा मास्टर ट्रेनर जयश्री खोंडे यांनी केले. 

जयश्री खोंडे म्हणाल्या, स्त्री आता अबला नसून सबला बनली आहे. शासनाने महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात कठोर कायदे केले असून, महिलांच्या हितासाठी विविध उपाययोजनाही करीत आहे. 'लेक वाचवा, लेक शिकवा' हा शासनाचा अभिनव उपक्रम असून मुली व युवतींनी उत्तमोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन सामाजिकदृष्ट्या क्रांती घडवून आणण्याची आवश्यकता आहे. शिक्षणातूनच समाजाचा सर्वांगिण विकास होतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे जयश्री खोंडे यांनी सांगितले.

'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' हे अगदी सूर्यप्रकाशाइतके सत्य असून, स्त्री भ्रूण हत्या थांबवून मुलींचा सन्मान वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी युवती व मुलींनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन निर्भीडपणे कार्य करावे आणि महिलांना सामर्थ्यशाली बनविण्याच्या कामात योगदान दयावे, असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेच्या जिल्हा मास्टर ट्रेनर जयश्री खोंडे यांनी केले. याप्रसंगी जयश्री खोंडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना शुभेच्छाही दिल्या.     


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0ULVB
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना