मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

मूठभर तांदूळ आणि २० रुपये मागून 'ते' जिंकले जिल्हा परिषदेची निवडणूक!

Sunday, 26th February 2017 12:42:13 AM

 

गडचिरोली, ता.२६: कुठल्याही प्रकारची साधनसामग्री नसताना आणि अख्खे पोलिस प्रशासनच गंभीर अपराध्यासारखे नजरकैदेत ठेवल्यागत वागवत असताना ग्रामसभांनी एकत्र येऊन सैनू गोटा व अॅड.लालसू नरोटे या दोन बहाद्दरांना जिल्हा परिषदेत निवडून दिले. गरिबांनी दिलेले मूठभर तांदूळ आणि २० रुपये यामुळे ही कमाल घडली. त्यातच सैनू गोटा यांनी चक्क तुरुंगात राहून विजयाची पताका फडकावल्याने या ऐतिहासीक विजयाची चर्चा आता गडचिरोलीबाहेरही होऊ लागली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, दमकोंडावाही, आगरी-मसेली इत्यादी लोहखानी प्रस्तावित आहेत. सुरजागड खाणीचे कामही सुरु झाले आहे. या खाणींमुळे आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येऊन पर्यावरणाची मोठी हानी होईल, असे त्या भागातील आदिवासींचे मत आहे. खाण सुरु करताना 'पेसा' कायद्याचे उल्लंघन झाले असून, भांडवलवादी लोकांचाच फायदा होईल, यावर आदिवासींचे एकमत झाल्यानंतर त्यांनी ग्रामसभांच्या माध्यमातून मोठा लढा उभारला. मात्र, आमच्याकडे बघण्याची प्रशासनाची नजर वेगळीच असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून लोकशाहीच्या प्रवाहात यावे, यावर ग्रामसभांच्या म्होरक्यांमध्ये खलबते सुरु झाली. त्यातून हो-नाही म्हणता म्हणता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय सामूहिक चर्चेअंती घेण्यात आला. कोरची, धानोरा, एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही जागा लढविण्यासाठी उमेदवारांची चाचपणी झाली. लोकशाही मार्गानेच इच्छूकांकडून अर्ज मागवून आणि त्या-त्या भागातील जनतेच्या बहुमताने उमेदवारांची घोषणाही करण्यात आली.

ही प्रक्रिया सुरु असताना २० जानेवारीला एक आपत्ती ओढवली. छत्तीसगडमधून येणाऱ्या दोन मुलींना गडचिरोली पोलिसांनी अडविले. मात्र, त्या मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय आल्याने सैनू गोटा, रामदास जराते व अन्य काही सहकाऱ्यांनी गट्टा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी त्या मुलींना घेऊन उच्च न्यायालयाची पायरी गाठली. ही प्रक्रिया सुरु असतानाच पोलिसांनी सैनू गोटा, त्यांची पत्नी शीला गोटा, रामदास जराते व त्यांची पत्नी जयश्री जराते तसेच अन्य एका युवकास अटक करुन कारागृहात डांबले. अटकसत्र चालू असतानाच उच्च न्यायालयाने 'त्या' दोन मुलींवर अत्याचार झालाच नाही, असा निवाडा दिला. न्यायदेवतेच्या या निवाड्यामुळे उपरोक्त पाचही जणांकडे सर्वजण गंभीर गुन्हेगारासारखे बघू लागले. ज्यांच्यासाठी उपरोक्त मंडळींनी पायपीट केली, 'त्या' दोन मुली निवांतपणे आपल्या घरी गेल्या. मात्र पायपीट करणाऱ्यांना कारागृहात जावे लागले. योगायोगाने सैनू गोटा, रामदास जराते, शीला गोटा यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, त्यांना प्रचार करण्याची उजागरी नव्हती. भामरागड तालुक्यात अॅड.लालसू नरोटे व अन्य काही उमेदवार कारवाईच्या भीतीचे ओझे घेऊनच फिरत होते. तिकडे गोटा आणि जराते या उमेदवारांचे जीव साखळदंडाने बांधले असताना इकडे गावागावातला कार्यकर्ता मतदारांमध्ये 'प्राण' ओतत होता. २० रुपये वर्गणी आणि थोडेसे तांदूळ मागून कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने मत मागायला फिरत होते. सर्वांनी जंगल पालथे घातले, दगडधोंड्यांच्या वाटा तुडविल्या. आमचे उमेदवार निवडून येतील की नाही, अशी धाकधूक ग्रामसभांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. पण, २३ फेब्रुवारीला पेट्या फुटल्या आणि सैनू गोटा व अॅड.लालसू नरोटे मोठ्या फरकाने विजयी झाले.

अतिदुर्गम आरेवाडा-नेलगुंडा जिल्हा परिषद मतदारसंघातून अॅड. लालसु नरोटे, तर गट्टा-पुरसलगोंदी मतदारसंघातून सैनु गोटांनी बाजी मारली. शिवाय भामरागड तालुक्यातील आरेवाडा पंचायत समिती गणातून प्रेमिला झुरू कुड्यामी, नेलगुंडा गणातून सुकराम महागू मडावी, कोठी गणातून गोई बलदेव कोडापे व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पंचायत समिती गणातून शीला गोटा विजयी झाले. पेंढरी-कारवाफा जिल्हा परिषद क्षेत्रातून रामदास जराते, तसेच कोरची तालुक्यातील उमेदवारांनीही चांगलीच झुंज दिली.

ग्रामसभांच्या उमेदवारांनी मिळविलेल्या या विजयाकडे ऐतिहासीक बाब म्हणून बघितले जाणार आहे. पैसे देऊन मत विकत घेणाऱ्या राजकीय पक्षांना मतदारांना पैसे मागून मतही मागता येते, हे ग्रामसभांच्या उमेदवारांनी दाखवून दिले आहे. १९९० च्या दशकात कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. तीन खोल्यांचे घर, एक बिछाना आणि पिण्याच्या पाण्याचे एक मडके, एवढीच संपत्ती असलेल्या सुदामकाकांना लोकांनी 'तुमचाच गेरु, तुमचाच चुना, सुदामकाकांना निवडून आणा', असे म्हणून निवडून दिले होते. ग्रामसभांच्या उमेदवारांनीही सुदामकाकांचाच कित्ता गिरविला, हे येथे महत्वाचे आहे.

लालसू नरोटेंबद्दल थोडेसे....

भामरागड तालुक्यातील जुव्वी गावचे रहिवासी असलेल्या लालसू नरोटेंनी पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या सानिध्यात राहून हेमलकस्याच्या लोकबिरादरी विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याच्या प्रतिष्ठित लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळविली. त्यांना शहरात चांगला वकिलीचा व्यवसाय करता आला असता. परंतु पैशाकडे पाठ फिरवून लालसूंनी गरीब आदिवासींसाठी जीवन वाहून घेण्याचे ठरविले. आदिवासींना शासनाच्या सोयी, सुविधा मिळवून देण्यापासून तर त्यांच्यावरील अन्याय-अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे सातत्य मागील १२ वर्षांपासून लालसू नरोटेंनी आजतागायत कायम ठेवले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MMXS4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना