सोमवार, 19 नोव्हेंबर 2018
लक्षवेधी :
  चकमकीत दोन नक्षलवादी ठार-न्याहाकल जंगल परिसरातील घटना              दोन हजारांची लाच स्वीकारताना देसाईगंज पोलिस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

बंटी भांगडियांचा यांचा अखेर भाजपप्रवेश

Sunday, 17th August 2014 11:24:54 AM

गडचिरोली, ता. १७ : युवा शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांचे पुत्र बंटी उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी आज (ता. १७) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांच्याच नागपुरातील महाल येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघेल, असे जाणकारांना वाटत आहे.

बंटी भांगडिया यांनी भाजपात प्रवेश केला, त्यावेळी खा. अशोक नेते, आ. शोभाताई फडणवीस, आ. सुधीर पारवे, आ. मितेश भागडिया, आ़ अतुल देशकर, भाजपाचे संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, युवा शक्ती संघटनेचे गडचिरोली उपजिल्हाप्रमुख प्रा़ राजेश कात्रटवार, प्रा़ रमेश चौधरी, आनंद शृंगारपवार, नगराध्यक्ष निर्मला मडके, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, चामोर्शी पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत, देसाईगंज पंचायत समितीच्या उपसभापती प्रीती शंभरकर, शरद कोलेट्टीवार, कल्पना कोडापे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कंत्राटदार म्हणून परिचित असलेले मितेश भांगडिया आणि त्यांचे पुत्र बंटी भांगडिया हे मूळचे चिमूर येथील रहिवासी आहेत. बंटी भांगडिया यांनी २६ जानेवारी २०१० रोजी चिमूर येथे युवा शक्ती संघटनेची स्थापना केली. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेत दोन गट पडले होते. सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या मोठ्या गटाने त्यावेळी बंटी भांगडिया यांच्याशी संपर्क साधून ४ जून २०११ रोजी गडचिरोलीत युवा शक्ती संघटनेची स्थापना केली. पुढे डिसेंबर २०११ मध्ये गडचिरोली आणि देसाईगंज नगर परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत गडचिरोली नगर परिषदेमध्ये युवा शक्ती संघटनेने १३जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही युवा शक्ती संघटनेला घवघवीत यश मिळाले. जिल्हा परिषदेत ६ जागा मिळाल्याने सत्तेत भागीदारीही मिळाली. या यशाच्या बळावरच मितेश भांगडिया मे २०१२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून विजयी झाले. तेव्हापासून युवा शक्ती संघटना भाजपात विलीन होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, अनेक कार्यकर्त्यांचा त्याला विरोध होता. पुढे यंदा एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार करायचा की, अन्य उमेदवाराचा, यावरून कार्यकर्त्यांमध्ये सरळ दोन गट पडले. युवा शक्ती संघटना सुरुवातीला चिमूर आणि आरमोरी या दोन विधानसभा क्षेत्रांसाठी आग्रही होती. परंतु भाजप-शिवसेना युतीत आरमोरीची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने ही जागा युवा शक्ती संघटनेला मिळण्याची शक्यता धूसर झाली आणि संघटनेच्या प्रमुखांनीही त्याबाबत भाजप नेतृत्वाकडे फार आग्रह धरला नाही. संघटनेत फूट पडण्याचे हेदेखीलदुसरे महत्त्वाचे कारण होते.

त्यामुळे युवा शक्ती संघटनेची मुहूर्तमेढ रोवणारे सुरेंद्रसिंह चंदेल व त्यांचे काही सहकारी या संघटनेपासून दुरावत गेले. सध्या श्री़चंदेल युवा शक्ती संघटनेपासून अलिप्त असून, ते शिवसेनेचे दार ठोठावत आहेत. अशा स्थितीत प्रा. राजेश कात्रटवार, प्रा.रमेश चौधरी, आनंद शृंगारपवार व भूपेश कुळमेथे यांच्या नेतृत्वातील एक गट बंटी भांगडिया यांच्याशी जुळून राहिला. या गटाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे गडचिरोली विधानसभेची जागा युवा शक्ती संघटनेला मिळावी, यासाठी हा गट पुरेपूर प्रयत्न करीत आहे. गडकरी वाड्यावर नेमकी काय चर्चा झाली, हे अजून बाहेर यायचे असले; तरी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. सद्य:स्थितीत गडचिराली विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून लढण्यास अनेक जण इच्छूक आहेत. अशावेळी बंटी भांगडियांच्या भाजप प्रवेशामुळे गडचिरोलीची जागा युवा शक्ती संघटनेकडे गेल्यास येथील राजकारणात मोठे स्थित्यंतर घडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AIXCJ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना