गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

हर हर महादेवच्या गजरात मार्कडादेव यात्रेला प्रारंभ

Monday, 7th March 2016 06:55:11 AM

 

गडचिरोली, ता.७: "हर बोला... हर हर महादेव" असा गजर करीत आज लाखो भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त मार्कडादेव येथे भरलेल्या यात्रेत हजेरी लावून शिवशंभो व महामृत्युंजय मार्कंडेश्वराची मनोभावे पूजा-अर्चा केली. चपराळा, अरततोंडी, वैरागड येथेही हजारो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले.

मार्कंडादेव येथे आज पहाटे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, खा.अशोक नेते व आ.डॉ.देवराव होळी यांनी शिवलिंग व मार्कंडेश्वराची महापूजा केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या राणी रुक्मिणीदेवी, अवधेशरावबाबा, प्रवीणबाबा, पंकज पांडे, शुभांगी पांडे, भारत खटी, नाना महाराज आमगावकर, रामेश्वर महाराज उपस्थित होते. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पा.मो.पांडे, रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष किसन गिरडकर, केशव आंबटवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पहाटे ४ वाजता महापूजेस सुरुवात झाली. सकाळी ६ वाजता महापूजा आटोपल्यानंतर रांगेतील भाविकांना पूजेसाठी सोडण्यात आले. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिया या जिल्हयांतील नागरिकांसह शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील भाविकांनीही मार्कंडादेव यात्रेत सहभागी होऊन शिवशंभोचे दर्शन घेतले. मार्कडेश्वर देवस्थानतर्फे भाविकांना महाप्रसाद वितरीत करण्यात आला. हजारो भक्तांनी मार्कडेश्वर मंदिरालगतच्या वैनगंगा नदीत स्नान केले. या यात्रेच्या आयोजनसाठी मार्कडेश्वर ट्रस्ट, महसुल विभाग, पंचायत विभागाने सहकार्य केले. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. आणखी पाच दिवस ही यात्रा सुरु राहणार आहे.

मार्कडादेव येथील यात्रेशिवाय चपराळा येथेही भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथेही यात्रा भरली आहे. तेथील महादेव गडावरील पुरातन हेमाडपंथी शिवमंदिरात आ.क्रिष्णा गजबे यांनी पहाटे पाच वाजता सपत्नीक पूजा केली. यावेळी कुरखेडा येथील नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, अॅड.उमेश वालदे, अॅड.प्रमोद बुद्धे, अरततोंडीच्या सरपंच प्रियंका हलामी, उपसरपंच साईनाथ खुने, पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, विवेक बुद्धे, देवानंद खुने, खुशाल फुलबांधे, रामभाऊ परशुरामकर, तारेंद्र डहाळे, तसेच श्री भगवान महादेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रामुख्याने उपस्थित होते. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथेही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U7L50
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना